Thursday, 27 September 2018

महाराष्ट्राला राष्ट्रीय पर्यटनाचे तीन पुरस्कार







नवी दिल्ली, 27देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील दोन हॉटेल आणि एका संस्थेला आज  केंद्रीय पर्यटन मंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फॉन्स यांच्या हस्ते  राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने आज विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार2016 -17  वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यटन सचिव रश्मी वर्मा उपस्थित होत्या.  देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणा-या 77 हॉटेल्स  व संस्थांना विविध श्रेणीत  पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द- फर्न आणि औरंगाबाद येथील ‘लेमन ट्री हॉटेल’ यांच्यासह  मुंबई येथील ‘ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथील मेलुहा-द-फर्न या हे देशातील सर्वोत्तम पर्यावरण स्नेही हॉटेल ठरले आहे. पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथे स्थित या पंचातारांकित हॉटेल मध्ये अभ्यागत व पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच पर्यावरण स्नेही वातावरण जपण्यात आले आहे.

औरगांबाद येथील लेमन ट्री हॉटेल देशातील सर्वोत्तम थ्री स्टार हॉटेल ठरले आहे. अजिंठा व वेरूळ लेण्यांना भेट देणा-या देश-विदेशातील पर्यटकांसह चिखलठाणा, वाळुंज , चितगाव, शेंद्रा व पैठण या औद्योगिक क्षेत्रांना भेटी देणा-या उद्योजकांची  पहिली पसंती या हॉटेलला मिळाली आहे.

मुंबई येथील  ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेला देशातील सर्वोत्तम ग्रामीण कृषी पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेने ग्रामीण भागाशी नाड राखून ग्रामीण जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.  
       0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 357/ दिनांक  27.09.2018




                                      



No comments:

Post a Comment