नवी
दिल्ली, 25 : 2 ते 5 ऑक्टोबर 2018 दरम्यान
होणा-या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्र भागीदार राज्य असणार आहे.
राष्ट्रीय मिडीया केंद्रात आयोजित
पत्रकार परिषदेत केंद्रीय ऊर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांनी ही
माहिती दिली. आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते विज्ञान भवनात 2 ऑक्टोबरला सांयकाळी 6.30 ला होणार असून पुढील
कार्यक्रम हा इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे होणार आहे.
2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणा-या
जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेमध्ये ‘आंतराराष्ट्रीय सौर
आघाडी’ ची पहिली बैठक, इंडियन ओशन रिम असोसिऐशनची (आयओआरए)
नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयीन’ बैठक ‘जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद’ आणि प्रदर्शन
(रिइन्वेस्ट-2018) कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या जागतिक परिषदेत जगातील 50 पेक्षा
अधिक राष्ट्र सहभागी होणार असल्याची
माहिती केंद्रीय मंत्री सिंह यांनी दिली.
आंतराराष्ट्रीय परिषदेत भागीदार राज्य म्हणून
महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्रालय सहभागी होणार आहे. महाराष्ट्र सोबतच कर्नाटक, गुजरात
तसेच अन्य काही राज्यही सहभागी होणार आहेत.
ग्रेटर नोएडा येथे होणा-या रि-इन्वेस्ट
परिषदेच्या ठिकाणी प्रदर्शन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने 3 हजार
चौरस वर्ग फुटाचे दालन उभारण्यात येणार आहे. या दालनामध्ये महाराष्ट्राने अक्षय ऊर्जा,
सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली यशस्वी कामगिरी येथे मांडण्यात येणार असल्याची माहिती
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) चे नोडल अधिकारी महेश आवाड यांनी दिली.
राज्य सरकारने 31 मार्च 2018 पर्यंत
8343 मेगावॅटची सौर क्षमता स्थापित केलेली आहे याची माहिती देणारा लघूपट,
संगणकीकृत सादरीकरण येथे मांडण्यात येणार आहे. यासोबत राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’, ‘मुख्यमंत्री सौर पेयजल योजने’मध्ये केलेली कामगिरीही
या ठिाकणी दर्शविण्यात येणार असल्याचेही श्री आवाड यांनी माहिती दिली.
सौर व अक्षय ऊर्जेच्या दूस-या जागतीक ऊर्जा
परिषदेचा उद्देश ऊर्जेची क्षमता वाढविण्यासाठी वैश्विक पातळीवर प्रयत्न करणे, वैश्विक गुंतवणूक समुहाला
जोडणे हा आहे. आयोजित 3 दिवसीय रि-इन्वेस्ट परिषदेत क्लीनटेक, भविष्यात वापरात येणारे
ऊर्जेची पर्यायी व्यवस्था, अक्षय ऊर्जा निर्माता, विकासक, गुंतवणुकदार, या
क्षेत्रात अभिनव कल्पना मांडणारे व्यक्ती, या क्षेत्रात यशस्वी व्यक्तींना आमंत्रित करून चर्चा
केली जाणार आहे. या रि-इन्वेस्ट परिषदेत 600 पेक्षा अधिक दिग्गज उद्योजक आणि 10,
हजार प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती श्री सिंह यांनी दिली.
No comments:
Post a Comment