Friday, 14 September 2018

महाराष्ट्राला प्रतिष्ठेचे ६ राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार




नवी दिल्ली , १४ :  केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्यावतीने  महाराष्ट्राला  प्रतिष्ठेचे ६ राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय  कामगार व रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांच्या हस्ते सोमवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
             
केंद्रीय कामगार रोजगार मंत्रालयाच्यावतीने देशातील कारखाने व उद्योग क्षेत्रात सुरक्षा मानकांची प्रभावी अंमलबजावणीसाठी दरवर्षी विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. वर्ष २०१६ च्या राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ३ कंपन्यांना विजेता तर ३ कंपन्यांना उपविजेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

            निवड झालेल्या महाराष्ट्रातील कंपन्यांमध्ये  फॅब्रीकेटेड मेटल उत्पादन करणा-या कंपन्यांच्या श्रेणीत रायगड जिल्हयातील तळोजा एमआयडीसी भागातील एसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली आहे. इलेक्ट्रॉनिक  वस्तू  निर्मिती करणा-या कंपन्यांच्या श्रेणीत ठाणे जिल्हयातील भिवंडी येथील गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरींग कंपनी लिमीटेड विजेती ठरली आहे. रबर आणि प्लॅस्टिक उत्पादन करणा-या कंपन्यांच्या श्रेणीमध्ये पुणे येथील सनसवाडी भागातील कुपर स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमीटेड विजेती ठरली आहे.

            रासायनिक पदार्थांचे उत्पादन करणा-या कंपन्यांच्या श्रेणीत रायगड जिल्हयातील रोहा तालुक्यातील अमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमीटेड उपविजेती ठरली आहे. रबर आणि प्लॅस्टिक उत्पादन करणा-या कंपन्यांच्या श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्हयातील वळुंज येथील गरवारे पॉलियेस्टर लिमिटेड आणि खनिज द्रव्य पदार्थ उत्पादन करणा-या कंपन्यांच्या श्रेणीमध्ये नागपूर येथील बुटीबोरी भागातील रिलायंस सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड उपविजेती ठरली आहे.     


                  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
0000
रितेश भुयार,/ वृत्त वि. क्र.३४6 / दिनांक १.०९.२०१८ 

No comments:

Post a Comment