Monday 29 October 2018

महाराष्ट्राला लागणारा 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळसा मिळावा : ऊर्जा मंत्री बावनकुळे



नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्र राज्याने ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात उच्चांक गाठला असून सध्या महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळश्याची आवश्यकता असून हा कोळसा केंद्राकडून मिळावा, अशी मागणी केली असल्याची  माहिती महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.
     
वीज निर्मितीमध्ये कोळसा अत्यंत महत्वाचा  घटक आहे. राज्याला हा कोळसा सिंगरीन कोलरीस कंपनी लिमीटेड, महानदी कोल्डफिल्ड लिमीटेड, वेर्स्टन कोलफिल्ड लिमीटेड या कंपन्यांमधून  उपलब्ध होतो. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोळसा मिळण्यासंदर्भातील झालेल्या करारानुसार कोळसा नियमित मिळावा, यासाठी केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी प्रयत्न केले असून महाजनको आणि केंद्रीय कोळसा विभागाची बैठक घेण्याची सूचना श्री गोयल यांनी दिली होती. त्याप्रमाणे आज शास्त्री भवन येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे बैठक घेण्यात आली असल्याची, माहिती  श्री बावनकुळे यांनी दिली.
सध्या राज्यात वीजेची मागणी वाढलेली आहे. यावर्षी 24 हजार 142 मेगा वॅटपर्यंत वीज निर्माण करण्याचा उच्चांक राज्याने गाठला आहे. यापुर्वी ऑक्टोबर महिन्यात 19 हजार मेगा वॅटपेक्षा अधिक वीज निर्माण झालेली नाही. सध्या राज्याला 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळश्याची आवश्यकता असल्याची, माहिती श्री बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील 7.50 लाख शेतक-यांना वीज जोडणी दिलेली आहे. घरगुती ग्राहकांच्या वीज जोडणीमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे वीजेची मागणी मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेली  आहे. सध्या राज्याला 32 रॅक कोळसा हवा आहे. हा कोळसा लवकरात लवकर मिळावा, यासाठी आज वरिष्ठ अधिका-यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.  राज्याला महाराष्ट्रा बाहेरून मिळणारा कोळसा लवकरात लवकर उपलब्ध व्हावा,  यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असून केंद्रीय कोळसा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी यावर लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
000000

अंजुनिमसरकर/वृ.क्र.387/29/10/2010

No comments:

Post a Comment