Thursday, 11 October 2018

महाराष्ट्रामध्ये 2000 शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचे लक्ष्य : सभांजी निलंगेकर-पाटील





नवी दिल्ली, 11 :राज्यातील युवक-युवतींना कृषी आधारित कौशल्य प्रदान करून याव्दारे 2000 शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती, राज्याचे कौशल्य विकास मंत्री सभांजी निलंगेकर-पाटील यांनी आज येथे दिली.

येथील श्रम शक्ती भवन मध्ये केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सहसचिव राजेश अग्रवाल यांच्या कक्षात आयोजित बैठकीनंतर श्री पाटील यांनी ही माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी संचालक डी.डी. पवार, सकाळ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर आणि पल्लाडियम सल्लागार इंडिया प्रा. लि. च्या कार्यकारी अधिकारी श्रीमती बरबोरा सुरती यांच्यामध्ये आज कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभगामार्फत राज्यातील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवती करीता राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातंर्गत गट कौशल्य आणि वैयत्किक कौशल्य असे दोन प्रकारचे प्रशिक्षण दिले जातील. कृषी आधारित गट प्रशिक्षणातून 2000 शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे माहिती श्री पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सासोयटी प्रशिक्षणासाठी लागणार निधी आणि एकूणच प्रशिक्षणावर देखरेख ठेवणार आहे. या प्रशिक्षणाची अमलबजावणी सकाळ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने केली जाणार आहे. तर पल्लाडियम सल्लगार इंडियाच्यावतीने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे विश्लेषण केले जाईल. आज या संदर्भातील करारावर स्वाक्ष-या झालया असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

प्रथम टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यात उपक्रम राबविण्यात येणार
प्रथम टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यामंध्ये प्रशिक्षण राबविण्यात येणार असून नागपूर, चंद्रपूर, वर्धा, औरंगाबाद, लातूर, आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. पुढच्या टप्प्यात राज्यातील उर्वरित जिल्हे निवडले जातील. या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात होत असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

असे होतील 2000 शेतकरी उत्पादक गट तयार

शेतकरी उत्पादक गट तयार करण्यासाठी गट कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल यामध्ये शेतक-यांचे नेतृत्व करणा-यांना तीन दिवसांचे वर्ग प्रशिक्षण व आठ आवडयांचे जोड कार्यक्रम तसेच प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये समूह शेती, विशेष पीक पद्धती, नवीन तंत्रज्ञान, बाजारातील दुवे, समूहाने माल विकणे, आदि विषयांचे अंतर्भाव असणार आहे. या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद करणार आहे. तर भारतीय कृषी कौशल्य परिषदेव्दारे अभ्यासक्रमाचे प्रमाणिकरण केले जाईल. कृषी आधारित गट प्रशिक्षणातून 2 लाख 82 हजार शेतक-यांना लाभ मिळणार असून 2000 शेतकरी उत्पादक गट निर्माण होतील.

वैयत्किक कौशल्य प्रशिक्षण असे मिळेल

वैयत्किक कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत 167 प्रशिक्षण केंद्रांमधून 8 अभ्यासक्रमांचे अल्प भूधारक शेतक-यांना तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छूक असलेल्या तरूण वर्गाला कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये दोन महिन्यांचे वर्ग प्रशिक्षण व एक महिना प्रत्यक्ष अनुभव असा अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असणार आहे. 8 अभ्यासक्रमांमध्ये सेंद्रीय उत्पादन, गुणवत्ता बियाणे उत्पादन, दुग्ध उत्पादन, जलाशय कामगार, बाग कामाचे प्रशिक्षण, कुक्कटपालन, हरितगृह चालक, सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञ विषय आहेत. या वैयत्त्किक प्रशिक्षणाव्दारे 44 हजार 238 लाभार्थ्यांना याचा लाभ होणारआहे. अभ्यासक्रमाचे प्रमाणिकरण भारतीय कृषी परिषद करणार आहे.

दोन्ही कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा एकूण कालावधी हा 16 महिन्यांचा आहे. यासाठी 190 कोटी रूपयांचा निधी अपेक्षति आहे. केंद्र शासनाचा कौशल्य विभाग मंत्रालयाच्यावतीने हा निधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता 31.15 कोटी रूपये राज्य शासनाला प्राप्त झालेले आहे. उर्वरित निधी 70 टक्के प्रशिक्षण कार्यक्रम झाल्यावर देण्यात येईल.

०००००

अंजू निमसरकर/वृत्त वि.क्र. 377/ दिनांक 11.10.2018

No comments:

Post a Comment