Thursday, 11 October 2018

मुंबई येथील ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ शेतीसाठी वरदान : मुख्यमंत्री फडणवीस



                                                          

        ‘औद्योगिक क्रांती केंद्राचे’ प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उदघाटन
                                                               
नवी दिल्ली, 11 : सॅनफ्रान्सिस्को पाठोपाठ आता भारतात थेट मुंबई येथे उभारण्यात येणा-या औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत केले.

             वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्यावतीने येथील हॉटेल आयटीसी मोर्य मध्ये आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंड यांच्यासह देश- विदेशातील आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर  उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून जगभर तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती, संरक्षण आदी क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य होत आहे. दावोस दौ-याच्यावेळी असे केंद्र मुंबई येथे स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या होत्या. आज वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.  

या केंद्रामुळे महाराष्ट्रासह देशातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा  होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेतीच्या विविध क्षेत्रात अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. शेतमाल विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये समन्वय स्थापित करणे, हवामान बदलानुसार शेतीची पीक व वान यांच्या पध्दतीत बदल करणे, शेती क्षेत्रात पीक साखळी निर्माण करणे, पिकांवर बोंडअळी सारख्या येणा-या रोगांवर  उपाय, दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाय आदी बाबी सुकर होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

देशात हवामान बदलामुळे होणा-या समस्यांवर औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून योग्य उपाय सुचविता येईत, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, ड्रोन आदिंचा प्रभावीपणे वापर करता येईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
              प्रधानमंत्री यांनी केले मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतूक    
औद्योगिक क्रांती केंद्र ४.० च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सेवांमध्ये सुधारणा  घडवून आणण्यासाठी  घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  श्री. फडणवीस यांचे आज वर्ल्ड एकोनॉमिक फोरमच्या परिषदेत कौतूक केले.      
            वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्यावतीने येथील हॉटेल आयटीसी मोर्य मध्ये आयोजित परिषदेच्या समारोप कार्यक्रमात प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंड यांच्यासह देश- विदेशातील आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर  उपस्थित होते.

             प्रधानमंत्री मोदी  यांच्या हस्ते आज या  परिषदेत या  मुंबई येथील ‘औद्योगिक क्रांती केंद्र ४.०’ केंद्राचे उद्घाटन झाले.  यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने  औद्योगिक क्रांती केंद्राच्या मदतीने शासनाने ड्रोन व इंटरनेटच्या माध्यमातून प्रशासकीय सेवांच्या सुधारणांसाठी घेतलेला पुढाकारा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ते म्हणाले या केंद्राच्या माध्यमातून देशातील सरकारी व खाजगी क्षेत्र व राज्यांच्या विकासात मोलाची मदत होणार आहे. देशातील उद्योग क्षेत्रालाही या केंद्रामुळे गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
                                   राज्यातील शेती क्षेत्रातील विकासाबाबत चर्चा
        वर्ल्ड इकोनॉमिक्स फोरमच्या  परिषदेत सहभाग घेण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी या फोरमच्या माध्यमातून सहयोगाबाबत चर्चा केली. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंड, निती आयोगाचे मुख्य कार्यअधिकारी अमिताब कांत , मुख्यमंत्री  यांचे  प्रधान सचिव भुषण गगरानी आदी उपस्थित होते.  
                            
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi                                                                               
                                                   ०००००
  रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 376/ दिनांक  11.10.2018








No comments:

Post a Comment