नवी दिल्ली, 17 : ‘आपलं घर’ या संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांच्या ‘पराजय नव्हे विजय’ या
पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी, गुजराती, ब्रेल लिपीत आणि मराठी भाषेतील 10 व्या
आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी सांयकाळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्याम जाजु,
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले.
येथील माळवणकर सभागृहात ‘पुढचे पाऊल’ या
दिल्लीतील मराठी अधिका-यांच्या संस्थेच्यावतीने ‘पराजय नव्हे
विजय’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘तेजोमय
तेजोनिधी’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्य रचनांवर आधारित
नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विजय फळणीकर, श्याम
जाजू, ‘पुढचे पाऊल’ चे संस्थापक तथा सचिव
ज्ञानेश्वर मुळे, वाईस ऍडमिरल श्री एस.एन.घोडमारे, के.सी पांडे मंचावर होते.
‘पराजय नव्हे विजय’ पुस्तकाचे
लेखक श्री फळणीकर म्हणाले, मी ‘आपलं घर’ ही संस्था समाजातील लोकांच्या माध्यमातूनच उभी करू शकलो. मला पडत्या
काळात ज्या-ज्या व्यक्तीने मदत केली त्या सर्वांचा मी सदैव ऋणी आहे. आपलं घर कस उभ राहील या बद्दलची माहिती ही
प्रत्यक्ष संस्थेला भेट दिल्यानंतरच लक्षात येईल. आपण कितीही मोठ काम करित असलो
तरी कधीही मी पणा येऊ देऊ नये अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री जाजु यांनी श्री फळणीकर यांच्या कामाचे
कौतुक केले. ‘आपलं घर’ सारखी संस्था
उभी करण्यासाठी लागणारे बळ फार थोडयांकडे असते, असे म्हणाले. श्री
फळणीकरांचे व्यक्तिमत्व आधी केले मग सांगितले असे आहे. आदर्श जीवनाचा पायंडा श्री
फळणीकर यांनी घालुन दिला असल्याचे मनोगत श्री जाजु यांनी यावेळी व्यक्त केले.
ज्ञानेश्वर
मुळे म्हणाले, विजय फळणीकर यांचे आयुष्य प्रेरणादायी आहे. पोटच्या पोराच्या
मृत्युनंतर उभी केलेली ‘आपलं
घर’ ही संस्था अनेक अनाथ मुलांच्या डोक्यावर आज आई-बापाचे
प्रेम देण्यासाठी तत्पर आहे. त्यांच्या
कार्याला श्री मुळे यांनी शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,
नृत्यश्री यांच्यावतीने धनश्री आपटे आणि त्यांच्या चमुने ‘तेजोमय तेजोनिधी’ नृत्याविषकारातून
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार
उलगडले. सागरा प्राण तळमळला......, शतजन्म शोधिताना....., जयोस्तुते श्री
स्वतंत्रे....., सन्यस्थ खडग हे बौध्द धर्मावर आधारित गीत, तसेच अन्य काही काव्य
रचनांवर नृत्याविष्कार सादर केला. या गाण्यांचे संगीत वर्षा भावे तर संगीत संयोजन
कमलेश भडकमकर यांचे होते. या नृत्याविष्काराचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध चरित्र
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
लोकराज्य
दालनास मान्यवरांच्या भेटी
कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे महाराष्ट्र शासनाचे
मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचे दालन
उभारण्यात आले. या दालनास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये ‘आपलं घर’ चे विजय फळणीकर, राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त देवांशी जोशी, चरित्र अभिनेते राहुल सोलापूरकर, वाईस ऍडमिरल श्री एस.एन.घोडमारे, श्री विलास बुरडे यासह कार्यक्रमास उपस्थित अन्य लोकांनाही लोकराज्य दालनास
भेट दिली. लोकराज्य मासिक पसंतीचे मासिक
असल्याच्याही प्रतिक्रीया त्यांनी यावेळी नोदंविल्या.
No comments:
Post a Comment