Thursday 25 October 2018

पद्मविभूषण राम सुतार यांना टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार















             
नवी दिल्ली दि. 25 : शिल्प कलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांना वर्ष २०१६ साठी प्रतिष्ठेचा टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार जाहीर झाला आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश न्या. रंजन गोगोई आणि न्या. एन. गोपाल स्वामी , भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्या निवड समितीने बुधवारी वर्ष २०१४, २०१५ आणि २०१६ च्या टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कारासाठी दोन मान्यवर व एका संस्थेची निवड केली. वर्ष २०१६ च्या पुरस्कारासाठी राम सुतार यांची तर २०१४ च्या पुरस्कारासाठी प्रसिध्द मनिपुरी नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह आणि २०१५ साठी बांग्लादेशातील छायानट या सांस्कृतिक केंद्राची निवड करण्यात आली. १ कोटी रूपये मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

                          पद्मविभूषण राम सुतार यांच्या कला क्षेत्रातील योगदानाची दखल

            मुळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्हयातील गोदूर या छोटयाशा गावात जन्मलेले पद्मविभूषण राम सुतार यांनी शिल्पकलेत दिलेल्या बहुमूल्य योगदानाची दखल घेवून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शिल्पकलेतील ४० वर्षांच्या कारकिर्दीत श्री सुतार यांनी ५० पेक्षा अधिक भव्य शिल्प साकारले आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच श्री. सुतार यांनी जगप्रसिध्द अजिंठा व वेरूळ लेण्यांतील प्राचीन शिल्पांच्या जिर्णोध्दाराच्या कामात मोलाचे योगदान दिले आहे. मध्य प्रदेशातील गांधीसागर धरणातील ४५ फुटाचे भव्य चंबळ स्मारक हे त्यांच्या कार्याची महानता पटवून देणारे पहिले शिल्प ठरले. चंबळ आणि तिच्या दोन मुलांची ही भव्य मुर्ती  म्हणजे मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातील बंधुभावाचे प्रतिक ठरली. येथूनच भारतासह जगाला श्री. सुतार यांच्या कार्याची ओळख झाली. संसद परिसरातील महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज आदींचे भव्य शिल्पही श्री. सुतार यांनी उभारले आहेत. शिल्पकलेचा जतन, प्रचार व प्रसार करण्यात श्री. सुतार यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

                         वर्ष २०१२ मध्ये पहिला टागौर सांस्कृतिक ऐक्य पुरस्कार प्रसिध्द सितार वादक पंडित रवि शंकर यांची तर वर्ष २०१३ मध्ये प्रसिध्द संगीतकार झुबीन मेहता यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती .    
                                                   000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 383/  दिनांक २५.१०.२०१८ 
          









No comments:

Post a Comment