Tuesday, 23 October 2018

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतक-यांना रास्त व किफायतशीर दर मिळावा : सहकार मंत्री देशमुख






नवी दिल्ली, 23 : चालू वर्षात राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) मिळावा, अशी मागणी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे उच्चस्तरीय बैठकीत केली.
           
येथील परिवहन भवनात ऊस उत्पादक शेतक-यांचे विविध प्रश्नांसदर्भात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितिन गडकरी  यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. यावेळी  केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, ग्राम विकास मंत्री तथा बीडच्या पालक मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख, आमदार, वरीष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थीत होते.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी विविध संमस्यांना तोंड देत आहेत. त्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील  रास्त आणि किफायतशीर दर मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबरोबराच राज्यातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतक-यांवर बँकेचे कर्ज आहे. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणार नाही, अशा शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठन व्हावे. राज्यात यावर्षी साखरेचे अतिरीक्त उत्पादन झालेले आहे. मागील वर्षी साखरेला 2900/- रूपयाचा भाव मिळाल्यामुळे शेतक-यांना लाभ मिळाला होता. यावर्षीही अधिक भाव मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

पूर्वी केंद्र शासनाने मित्रा पॅकेजच्या माध्यमातून साखर कारखान्यांना दिलासा दिलेला आहे. यंदाही या प्रकाराचा निर्णय घ्यावा. एस.डी.एफ कर्जाचे पुर्नगठन करावे, अशा मागण्या श्रीमती मुंडे यांनी बैठकीत  केल्या.

मागील वर्षी इथेनॉल निर्मितीस प्राधान्य दिल्यामुळे तसेच शुगर ज्युस ते इथेनॉल ला 59/- पर युनिट भाव मिळाल्याने शेतकरी दुहेरी आनंदात होता. इथेनॉलच्या उत्पादनाला साखरेच्या तुलनेत अधिक दर मिळत असल्यामुळे  शेतक-यांवरील थकीत कर्जाची परत फेड होऊ शकते. यावर्षी इथेनॉलच्या उत्पादनात वाढ करण्यात यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांनी केले.
इथेनॉल उत्पादनामुळे राज्या बाहेरून होणारी कच्च्या तेलाची आयात थांबण्यात मदत होईल. शिवाय इथेनॉल प्रदूषण मुक्त पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत कमी दराने उपलब्ध होतो, त्यामुळे पुढील काळात राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना इथेनॉल तयार करण्यास अधिक प्रोत्साहन दयावे, अशा सूचनाही  श्री. गडकरी यांनी दिल्या. राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना याबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे आश्वसन श्रीमती मुंडे आणि देशमुख यांनी श्री गडकरी यांना यावेळी दिले.
आजच्या बैठकीस सर्वश्री आमदार मधुकरराव पिचड, राहुल कुल, संतोष दानवे, सहाकार व पणन विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडु पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.
000000
सूचना : सोबत छायाचित्रे जोडली आहेत.

अंजुनिमसरकर/वृ.क्र.381/22/10/2018

No comments:

Post a Comment