Monday 12 November 2018

‘नई चेतना’ रांगोळी व चित्रप्रदर्शनाने दिल्लीकरांची मने जिंकली














नवी दिल्ली, १२ : रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेली रेखीव व सुंदर व्यक्तीचित्रे. स्‍टोन आर्टच्या माध्यमातून ‘मुलगी वाचवा’ असा संदेश तर ॲक्रेलीक पेंटींगच्या माध्यमातून वाराणसी येथील घाट, छायाचित्रांच्यामाध्यमातून कोकणातील जीवन तसेच ५ वीत शिकणा-या विद्यार्थ्यांने रेखाटलेली चित्रे यांचा समावेश असणा-या ‘नई चेतना’ या प्रदर्शनाने दिल्लीकर कला प्रेमींची मने जिंकली आहे.

             सावंतवाडी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस.बी.पोलाजी यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या रांगोळीचे १६ वे आणि चित्रांचे ६ वे प्रदर्शन येथील रफी मार्गवरिल ‘ऑल इंडिया फाईन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीच्या’ दालनात आयोजित केले आहे. दिनांक ९ ते १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या  या पद्रर्शनाचे उदघाटन खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले.    

                         रांगोळीच्या माध्यमातून सुंदर व रेखीव व्यक्तीचित्रे

        या प्रदर्शनीच्या आरंभास काढण्यात आलेल्या सुरेख, सुंदर व रेखीव रांगोळया कला रसिकांना आकर्षित करीत आहेत. या ठिकाणी  सिध्देश धुरी यांनी रांगोळीच्या माध्यमातून देशाचे पहिले उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचे सुंदर व्यक्तीचित्र काढली आहेत. अक्षय सावंत या कलाकाराने माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सुरेख व्यक्तीचित्रे तर तन्मेश परब यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांची व्यक्तीचित्र काढली आहेत.

                         स्टोन आर्टच्या माध्यमातून वैविद्यपूर्ण विषयांची मांडणी
        या प्रदर्शनीत ऋतिका पालकर यांनी स्टोन आर्टच्या माध्यमातून विविध विषय मांडले आहे. यात ‘मुलगी वाचवा’ हा संदेश, आकाशात  विहार करणारी बगळयांची माळ, समुद्र किनारा अशा एकूण १७ कलाकृती प्रदर्शीत करण्यात आल्या आहेत.



                                         आयुष पाटणकर याची चित्रे ठरली आकर्षण
            सावंतवाडी येथील ५ व्या वर्गात शिकणारा व राज्य स्तरीय शालेय चित्रकला स्पर्धेचा सुवर्ण पदक विजेता आयुष पाटणकर याची एकूण ७ चित्रे या प्रदर्शनास भेट देणा-यांचे आकर्षण ठरत आहे. आयुषने दहीहांडी, नर्तकी, मोर, दिवाळी सण ,फुलदाणी या विषयांवर चित्रे रेखाटली आहेत.    

            सावंतवाडी येथील छायाचित्रकार अनिल भिसे यांनी टिपलेली १५ उत्कृष्ट छायाचित्रेही या प्रदर्शनीत मांडण्यात आली आहेत. यामध्ये कोकणातील जीवन हा विषय घेवून सागरास मिळणारी तेरेखोल नदी, गणपती रेखनी, दशवतार  लोककला, शिरोडा येथील मिठागार आदी चित्रांचा समावेश आहे.

  सिंधुदूर्ग जिल्हयातील सावंतवाडी तालुक्यातील कुमरल बांदो येथील सिध्देश धुरी यांनी धनगर, मॉर्डन काँपोजिशन, हम्पी आदी विषयांवर रेखाटलेली ५ चित्रे तसेच सावंतवाडी येथील अक्षय सावंत यांनी झाड या विषयावर रेखाटलेली ८ लँड स्केप, गोवा येथील अमेय कोरगावकर यांनी इंक पेन्सील वर्कच्या माध्यमातून वाराणसी येथील घाट, चार मिनार तसेच इंग्लड येथील काही प्रसिध्द वास्तु रेखाटल्या आाहेत. गोव्यातीलच  तन्मेश परब यांनी इंक पेन्सील वर्क द्वारे विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि बॉलीवुडचे सुप्रसिध्द कलाकार अमिताभ बच्चन, अमीर खान आणि ऋतीक रोशन यांची चित्रे रेखाटली आहेत.

 सिंधुदूर्ग जिल्हयातील बांदा येथील लक्ष्मण आपा तर्पे यांनी ॲक्रेलीक  पेंटींगच्या माध्यमातून  रेखाटलेली पक्षांची ६ चित्रे तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस.बी.पोलाजी यांनी रेखाटलेली कमळांची   चित्रे कला प्रेमींचे खास आकर्षण ठरले आहे.

या प्रदर्शनीस जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.  येथील बरेचशा चित्रांची विक्री झाली आहे.

हे प्रदर्शन दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायकांळी  ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले आहे.
  
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                             http://twitter.com/micnewdelhi  
                                             
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.३९२/  दिनांक  12.11.2018 
000000


No comments:

Post a Comment