द
नवी दिल्ली, २२ : भंडारा येथील आदिवासी
स्वयं कला संस्थेच्या महिलांनी तयार केलेल्या ‘मशरूम बिस्कीटांना’ दिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, ‘आदि महोत्सवाच्या’
सहाव्या दिवशीच हे बिस्कीट संपली आहेत. यासोबतच
राज्यातील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू या महोत्सवास
भेट देणा-या देश-विदेशींचे आकर्षण ठरत आहे.
केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय आणि भारतीय आदिवासी
सहकारी विपणन विकास महामंडळ यांच्यावतीने येथील दिल्ली हाट येथे दिनांक १६ ते ३० नोव्हेंबर
२०१८ दरम्यान ‘आदि महोत्सव’ या देशभरातील
आदिवासी कलाकारांच्या वस्तू, खाद्य पदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात
आले आहे. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जिओल ओराम यांच्या हस्ते
या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात देशभरातील २३ राज्यांतील
६०० कलाकार, २० राज्यांतील ८० शेफ आणि नृत्य कलाकारांचे १४ संघ
सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील २ खाद्यपदार्थांचे व ६ हस्तकलेचे असे एकूण ८ स्टॉल्स याठिकाणी
असून एकूण २१ कलाकार सहभागी झाले आहेत.
‘दिल्ली हाट’च्या ऍम्पी थिएटर परिसरात भंडारा जिल्हयातील
सालेकसा तालुक्यातील जांभडी येथील सुनिता ऊइके यांच्या आदिवासी स्वयं कला संस्था खाद्यपदार्थांचा
स्टॉल येथे भेट देणा-यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील मशरुम बिस्कीट दिल्लीकरांच्या खास पसंतीस उतरले.
मशरुमच्या वैशिष्टय गुणांची खास पारख असणा-या दिल्लीकरांना
या बिस्कीटांनी भुरड पाडली आणि म्हणता म्हणता ६ दिवसात या स्टॉल वरील २०० मशरूम बिस्कीटची पाकीटे संपली. आदिवासींनी पिकविलेल्या मशरूमचा उपयोग करून स्वत:चे उत्पादन
युनीट असणा-या आदिवासी स्वयं कला संस्थेने या अनोख्या मशरूम बिस्कीटची
निर्मिती केली त्यास पहिल्याच प्रयत्नात राजधानीत मिळलेल्या प्रतिसादाने सुनिता ऊईके
समाधानी आहेत. या स्टॉलवरील आस्की हे तांदळापासून निर्मित धिरडे,
बेसन व सुजीचे लाडू आणि साबुदाना वडा हे जिन्नस दिल्लीतील खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
ऍम्पी थिएटर परिसरातच पुणे
येथील महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आदिवासी महिला
बचत गटाने खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला आहे. येथे राज्याच्या
व्यंजनाची खास ओळख करून देणा-या पुरणपोळीसह मासवडी, आलुवडी
आणि डांगर भाकरी हे वैशिष्टयपूर्ण खाद्यपदार्थ असून ते दिल्लीकरांच्या पसंतीस पडले
आहेत.
मेळघाटातील शुध्द मध, वारली पेंटींग आणि बांबू आर्टही ठरले आकर्षण
अमरावती जिल्हयातील मेळघाटात राहणाऱ्या कोरकु आदिवासी जमातींनी संकलीत केलेल्या
शुध्द मधाच्या स्टॉलकडेही येथे भेट देणा-या देश विदेशातील ग्राहकांचे
पाय स्थिरावत आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यातील सुसरदा येथे
खादी ग्रामोद्योगाच्या ‘स्फुर्ती प्रकल्पाच्या’ माध्यमातून या गावातील व गावाशेजारील ३७ गावच्या
एकूण ४५० आदिवासींनी मध संकलन केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. मुंबई स्थित भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या
माध्यमातून या प्रकल्पातील आदिवासींना मधमाशा न मारता शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे
प्रशिक्षण देण्यात आले व प्रक्रिया युनीटही सुरु करण्यात आले आहे. या स्टॉल वर २५० ग्रॅम पासून १ किलोच्या पॅक मध्ये मध उपलब्ध आहे.
पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्यातील कोसेसरी येथील
अंकुश करमोडा यांच्या वारली पेंटींगचा स्टॉल विदेशी ग्राहकांचे खास आकर्षण ठरला आहे.
या स्टॉलवर आदिवासींचे पांरपरिक तारपा नृत्य, मासेमारी,
आदिवासींचे धार्मिक सण उत्सव, आदिवासींची शेती,
मुंग्यांचे वारूळ या आशयाची
वारली पेंटींग बघायला मिळतात.
नाशिक जिल्हयातील सुरगना येथील विष्णू
भवर आणि उजेश मोहनकर या आदिवासी कलाकारांचा बांबू आर्ट स्टॉल आहे. बांबूच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले टी कोस्टर, पेन होल्डर, पेन स्टँड, बांबूपासून
निर्मित कप आदि वस्तू या स्टॉलवर आहेत.
नागपूर येथील विदर्भ आदिवासी
केंद्राचा कापडाचा स्टॉल याठिकाणी असून येथे सिल्कच्या साडया ,दुपट्टे, शर्ट ,जॅकेट आदि वस्तू
आहेत. भंडारा येथील अरमीरा महिला उद्योग आणि भंडारा जिल्हयातीलच
मोहाडी येथील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या कापडांचा स्टॉलही याठिकाणी येणा-या देश विदेशातील ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.
No comments:
Post a Comment