Thursday, 22 November 2018

राजधानीत महाराष्ट्रातील १० कलाकारांचे ‘मेलँग-२’ चित्रप्रदर्शन








            
नवी दिल्ली, २२ : महाराष्ट्राच्या विविध भागातील १० चित्रकार व शिल्पकारांनी एकत्र येत देशाच्या राजधानीत   ‘मेलँग-२’ हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे.
            चित्रकला व शिल्पकला क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील कलाकारांनी एकत्र येत राज्याची राजधानी मुंबई येथे जहांगीर ऑर्ट गॅलरी येथे ‘मेलँग-’ हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले, या प्रदर्शनास मिळालेल्या यशानंतर थेट देशाच्या राजधानीतच या कलाकारांनी दिल्लीत येणा-या देश- विदेशातील कला रसिकांसाठी ‘मेलँग-२’ हे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे.
            येथील इंडिया हॅबीटॅट सेंटरच्या ‘ओपन पाम कोर्ट गॅलरी’ येथे दिनांक २२ ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन आज ललीत कला अकादमीचे सचिव राजन फुलारी यांच्या हस्ते आणि प्रसिध्द शिल्पकार टीटू पटनायक यांच्या उपस्थित  झाले.
                                                  ६४ चित्र व १६ शिल्पांचा समावेश
        या प्रदर्शनीत ८ चित्रकारांची प्रत्येकी ८ असे एकूण अशी  ६४ चित्र आणि २ शिल्पकारांची प्रत्येकी ८ अशी एकूण १६ शिल्प मांडण्यात आली आहेत. ठाणे येथील चित्रकार अजित चौधरी, मुळचे नागपुरचे आणि सध्या चंदीगड येथे कला महाविद्यालयात कार्यरत आनंद शेंडे, नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक किशोर इंगळे, मुळचे नागपुरचे आणि दिल्लीत एम्स या संस्थेत कार्यरत आर्टीस्ट रामचंद्र पोकळे, मुळचे सोलापूर जिल्हयातील कुर्डुवाडी येथील आणि सध्या  नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक संजय जठार, जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मुंबई येथे कार्यरत  प्राध्यापक सिता गोंडाने आणि चित्रकार स्वाती साबळे या चित्रकारांची फिगरेटीव्ह आणि ॲबस्ट्रॅक प्रकारातील ॲक्रॅलीक, ऑईल आणि इंक पेंटींग येथे प्रदर्शनी व विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत.
            मुळचे सांगलीचे व सध्या मुंबईतील विरार येथे वास्तव्यास असणारे शिल्पकार प्रदिप कांबळे आणि पालघर जिल्हयातील वसई येथील शिल्पकार सचिन चौधरी या शिल्पकारांचे निसर्गातील व मानवी आकाराच्या विविध छटा उलगडून दाखविणारे  शिल्पही या ठिकाणी  मांडण्यात आली आहेत.
              दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहे.
                                 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०५/  दिनांक 22.11.2018 





No comments:

Post a Comment