Tuesday, 20 November 2018

‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतिची देश व जगाला ओळख : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु






                                                             
               आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिन साजरा 

नवी दिल्ली, २० : महाराष्ट्राची लोककला ही समृध्द असून यामाध्यमातून राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात ‘महाराष्ट्र दिना’च्या आयोजनामुळे या समृध्द संस्कृतीची ओळखच देश व जगाला झाली, असे गौरवोद्गगार केंद्रीय  वाणिज्य व उद्योग, नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांनी काढले.
येथील प्रगती मैदानावर ३८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आज आयोजित महाराष्ट्र दिनाचे उदघाटन श्री. प्रभु यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे आणि श्रीमती उमा प्रभु यावेळी  उपस्थित  होत्या.
          श्री. प्रभु म्हणाले,  लावणी, दिंडी नृत्य, कोळी नृत्य आदी महाराष्ट्रातील लोककलांमुळे महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारस्याचे सादरीकरण होते. महाराष्ट्र दिनाच्या आयोजनामुळे ही परंपरा देशासमोर मांडण्यात आली याचा आनंद आहे. या कार्यक्रमाद्वारे राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले आहे. आज भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दिनाच्या माध्यमातून ही लोककला देश-विेदशात पोहचत असल्याचा अभिमान वाटत आहे असेही ते म्हणाले.  
                              महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण
महाराष्ट्र दिना निमित्त आयोजित ‘संगीत महाराष्ट्र’ कार्यक्रमातील गण-गौळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, दिंडी, अभंग, वासुदेव आदी लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाच्या दमदार सादरीकरणाने प्रगती मैदानात उपस्थित देश-विदेशातील प्रेक्षकांची मने जिंकली.
 भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात दररोज सायंकाळी हंसध्वनी सभागृह येथे व्यापार मेळयात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळयाच्या सातव्या दिवशी आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
            मुंबई येथील 'पृथ्वी आर्ट’ गृपच्या कलाकारांनी ‘ संगीत महाराष्ट्र् ’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने  या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे  दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेट प्रेक्षकांमधून निघालेली वारक-यांची दिंडी पाहून उपस्थितांनी उभे राहत दिंडीला मानवंदना दिली. शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडा-कपारीत राहणा-या ठाकर जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, संताचे अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबींबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.                
                                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०२/  दिनांक 20.11.2018 



                                       
              






No comments:

Post a Comment