Tuesday, 13 November 2018

सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमच्या पुनर्विकास आराखडयास मंजुरी












                           सिध्देश्वर तलाव सुशोभिकरणाचा प्रस्तावही मंजूर 
नवी दिल्ली, १३ : सोलापुर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा पुनर्विकास आराखडा आणि सिध्देश्वर तलाव परिसराच्या सुशोभिकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आज मंजुरी दिल्याची माहिती सोलापुर महानगर पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.

            केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या येथील तिलक मार्ग वरिल पुरातत्व भवनात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस पुरातत्व विभागाच्या महासंचालक उषा शर्मा, सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्रातून निवड झालेल्या स्मार्ट सिटी मध्ये सोलापूरचा समावेश असून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा पुनर्विकास आराखडा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मंजुरी करिता प्रलंबित होता. आजच्या बैठकीत काही किरकोळ सूचना व दुरुस्तींसह या आराखडयास मंजुरी देण्यात आल्याचे डॉ.ढाकणे यांनी सांगितले.

            स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर तलाव परिसरात सुशोभिकरण आणि लाईट अँड साऊंड शो सुरु करण्याचा प्रस्ताव पुरातत्व खात्याकडे पाठविण्यात आला होता. पूर्वनियोजनानुसार हा प्रकल्प शहरातील भुईकोट किल्ल्यातील भिंतीवर प्रस्तावित होता. मात्र, महानगर पालिकेने भुईकोट किल्ल्या ऐवजी  हा प्रकल्प  सिध्देश्वर तलावाकरिता मंजुरीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे पाठविला. आजच्या बैठकीत  काही किरकोळ सूचना व दुरुस्तींसह या आराखडयासही मंजुरी देण्यात आल्याचे डॉ.ढाकणे यांनी सांगितले.      

       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                             http://twitter.com/micnewdelhi  
                                             
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.३९४/  दिनांक  13.11.2018 
000000



No comments:

Post a Comment