Saturday, 1 December 2018

‘रोल मॉडेल’ भूषण तोष्णीवालच्या कर्तृत्वाची राष्ट्रीय पातळीवर दखल


       

                                     
नवी दिल्ली, : पुणे येथील पिंपरी -चिंचवड भागात राहणारे भूषण तोष्णीवाल यांनी दृष्टीहीनतेवर मात करून आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप सोडली आहे, त्यांचे व्यक्तीमत्व सर्वांसाठी रोल मॉडेल ठरले आहे. जागतिक अपंगदिनी उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारातील रोल मॉडेल हा बहुमान मिळणार आहे.
        महाराष्ट्र परिचय केंद्रास श्री.तोष्णीवाल यांनी आज भेट दिली. त्यांच्याशी झालेल्या अनौपचारीक गप्पांमधून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख झाली. त्यांचा जन्म हिंगोली जिल्हयातील शेणगाव तालुक्यातील पानकणेर या गावी झाला. जन्मानंतर केवळ २० दिवसांनी भूषण यांना डिटॅचमेंट ऑफ रेटीनामुळे अंधत्व आले आणि येथूनच त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु झाला. आई विजया व वडिल नंदकिशोर तोष्णीवाल हे भूषणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. पुढे वडिलांच्या व्यवसायामुळे  भूषण  पुणे येथे आले. गोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेत त्यांनी पहिली ते चौथी शिक्षण घेतले. नंतर चिंचवड येथील गीता मंदिर स्कुल येथे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व पुढे वाणीज्य शाखेत प्रवेश घेतला व २०११ मध्ये चार्टर्ड अकांऊंटटही झाले.
                                                         संगीत अंलकार परिक्षेत देशात प्रथम
        शिक्षणासोबतच भूषण यांना गायनाची आवड होती. आई-वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी गायन क्षेत्रातही आपली छाप उमटवली. वयाच्या ७ व्या वर्षी भूषण यांनी मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात गायन सादर केले. २०१४ मध्ये भूषण हे गांधर्व विद्यालयाच्या संगीत अलंकार परिक्षेत देशात प्रथम आले.  पुणे येथील भारती विद्यापिठातून त्यांनी संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी विविध दूरचित्र वाहिन्यांच्या संगीत कार्यक्रमांचे पारितोषिकही पटकावले व  आता ते गायानाचे स्वतंत्र कार्यक्रमही करतात.  
                                                                    
                                                            प्रेरणादायी वक्ते         
        स्वत:च्या आयुष्यातील संघर्षातून इतरांपुढे आदर्श निर्माण करणारे भूषण हे उत्तम प्रेरणादायी वक्ते आहेत. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रासह जयपूर, जोधपूर, बॅग्लुरु, कलकत्ता आदी ठिकाणी ४०० च्या वर प्रेरणादायी विचारांचे कार्यक्रम केले आहेत. सद्या ते पुणे येथील ओरिएंटल इंश्युरंस कंपनीत लेखा विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रेरणादायी विचाराच्या कार्यक्रमातच भूषण यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेल्या नागपूर येथील निलीमा येलकर यांच्या सोबत २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला.

दृष्टीहीनतेवर मात करून र्तृत्वाची वेगळी छाप सोडणारे भूषण तोष्णीवाल यांना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचा रोल मॉडेल या श्रेणीत राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.   डिसेंबर २०१८  या जागतिक अपंगदिनी उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
    
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१०/  दिनांक ०१.१२.२०१८ 








No comments:

Post a Comment