नवी दिल्ली, १ : प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास क्षमता असतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील क्षमता ओळखण्याची गरज असल्याचे विचार पुणे येथील प्रेरणादायी वक्ते भुषण तोष्णिवाल यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात आज मांडले.
दृष्टीहीनतेवर मात करून कतृत्वाची वेगळी छाप सोडणारे भूषण तोष्णीवाल यांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ जाहीर झाला असून ३ डिसेंबर २०१८ रोजी उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तोष्णीवाल यांचा सत्कार व त्यांच्या प्रेरक विचारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून तोष्णीवाल यांचे स्वागत केले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, भूषण यांचे वडील चार्टर्ड अकाऊंटंट नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यासह परिचय केंद्राचे अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तोष्णीवाल म्हणाले, जगविख्यात शिल्पकार मायकेल एंजोलो यांनी म्हटल्या प्रमाणे , प्रत्येक दगडात शिल्प दडले असते तसे प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता असतात मात्र, त्याची जाणीव नसते. आपल्यातील ही क्षमता ओळखून त्यानुसार व्यक्तीमत्वाला आकार दिला पाहिजे. भूषण यांच्यातील गायनाची आवड व क्षमता ओळखून त्यांच्या आई-वडीलांनी त्यांना दिलेले प्रोत्साहन व नंतर त्यांनी संगीत शिक्षण घेऊन गायक म्हणून मिळविलेली स्वतंत्र ओळख याबाबत त्यांनी माहिती दिली.
क्षमते प्रमाणेच जीवनाला एक निश्चित ध्येयही असावे लागते. माणसाजवळ बुध्दीमत्ता व कौशल्य असेल तर त्याचा योग्य उपयोग होण्यासाठी निश्चित ध्येयही असावे लागते. मात्र, अपयशाच्या भीतीपोटी अनेक जन ध्येयच निश्चित करत नाहीत तेव्हा प्रत्येकाने ध्येय निश्चित करून त्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आयुष्यात येणारे अपयश व त्यावर मात करण्यासाठीचे उपाय याविषयी स्वानुभवासह विविध उदाहरण देवून त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
बालपणीच दृष्टी गेल्यावर भूषण तोष्णीवाल यांनी खचून न जाता उच्च शिक्षण घेतले. त्यांनी चार्टर्ड अकाऊंटंटची पदवी मिळवली. सद्या ते पुणे येथील ओरिएंटल इंश्युरंस कंपनीत लेखा विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संगीत विषयात एम.ए. व अलंकार पदवी त्यांनी मिळविली असून ते गायनाचे कार्यक्रमही करतात. श्री. तोष्णीवाल हे उत्तम प्रेरणादायी वक्ते असून महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये त्यांचे आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाले आहेत.
No comments:
Post a Comment