नवी
दिल्ली दि. 15 : विधी अधिकार विषयक जनजागृती व प्रभावी विधी सेवा पुरविल्याबद्दल महाराष्ट्रातून रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण राज्यात अव्वल ठरले आहे. प्राधिकरणाचे
सातत्यपूर्ण काम आणि लोकांचा सक्रीय सहभाग यामुळेच या प्राधिकरणाची महाराष्ट्रातून
निवड झाल्याच्या भावना वरिष्ठ न्यायाधिश तथा रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
सचिव ए.एम. सामंत यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
उत्तम विधि सेवा पुरविण्यासाठी रत्नागिरी जिल्हयाचे प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.एन.जोशी आणि
प्राधिकरणाचे सचिव न्या.ए.एम.सामंत यांना केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर
प्रसाद यांच्या हस्ते आज सन्मानीत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय
केंद्रात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेदरम्यान
श्री. सामंत बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी न्या.आर.एन. जोशी आणि न्या. ए.एम.सामंत यांचे पुष्प गुच्छ देऊन
स्वागत केले.
देशभरातील विविध विधी सेवा प्राधिकरणांच्या कामांमध्ये निकोप
स्पर्धा ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकराणाच्यावतीने
राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच विधी सेवा
प्राधिकरणांच्या स्पर्धेतून रत्नागिरी विधी
सेवा प्राधिकरण सर्वोत्तम ठरल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, १९८७ पासून
देशात विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत जिल्हयाच्या ठिकाणी विधी सेवा
प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्रमुख जिल्हा न्यायाधिश हे प्राधिकरणाचे अध्यक्ष
असतात तर वरिष्ठ जिल्हा न्यायाधिश हे सचिव असतात. रत्नागिरीचे तत्कालीन प्रमुख
जिल्हा न्यायाधिश नागेश न्हावकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी विधी सेवा
प्राधिकरणाने शालेय विद्यार्थी,महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक, वकील यांच्यासाठी
विविध कार्यक्रम राबवून कायदेविषयक अधिकार व त्याचा प्रभावी वापर याबाबत जनजागृती
केली व प्रभावीपणे विधी सेवा पुरविल्या. मुख्यत्वे लहान मुलांच्या लैंगीक शोषणाविषयी
जनजागृती करण्यासाठी जिल्हयातील ४१
शाळांमध्ये 'बालक सुरक्षा संवाद' कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत ६
हजार९०० विद्यार्थी, ७३५ पालक आणि ८८ शिक्षकांनी सहभाग घेतला तर जिल्हयातील न्यायाधिश आणि कायदा साथी यांनी मार्गदर्शन केल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्याच्या
उद्देशाने जिल्हयात 'महिला दिन सप्ताह' साजरा करण्यात आला,
‘न्याय व्यवस्थेचे सक्षमीकरण व मानवाधिकार’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात
आल्या. असंघटीत क्षेत्रातातील कामगारांना शासकीय योजनांची माहिती व्हावी व
योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेता यावा म्हणून विशेष जागृती कार्यक्रम राबविण्यात आला
या अंतर्गत जिल्हयातील ५२५ असंघटीत कामगारांना माहिती पुस्तिका वितरीत करण्यात
आल्या व जिल्हयातील शासकीय कार्यलयांशी त्यांचा संपर्क करून देण्यात आला. जिल्हयातील गोरगरीब जनतेला कायदे विषयक माहिती
पुरविण्यासाठी ‘न्याय आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा विशेष
कारागृहातील कैद्यांनाही कायदे व मानवाधिकार विषयक मार्गदर्शन करण्यात आले .महिला
कैद्यांना हस्तकला विषयक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सामान्य जनतेला मोफत विधी
विषयक सल्ला व माहिती पुरविण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या मुख्यकार्यालयात ‘मुख्यद्वार
कार्यालय’ सुरु करण्यात आल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. या सर्व कार्याची
नोंद घेवूनच रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणाची महाराष्ट्रातील सर्वोत्तम प्राधिकरण
म्हणून निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाचे मुख्य
संरक्षक तथा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश नरेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष
न्या. ए.एस.ओक आणि सदस्य सचिव न्या. एस.डी. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे श्री. सामंत यांनी
सांगितले.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
0000000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र.४२२/ दिनांक १५.१२.२०१८
No comments:
Post a Comment