Thursday 20 December 2018

स्टार्टअप रँकींग जाहीर ; महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य




नवी दिल्ली दि. 20 : ‘राज्यांची स्टार्टअप रँकींग 2018’ आज येथे जाहीर करण्यात आली. या रँकींगमध्ये महाराष्ट्र राज्य उदयोन्मुख राज्य ठरले आहे.
           
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात या विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी ‘राज्यांचा स्टार्टअप रँकींग’ अहवाल जाहीर केला. यावेळी  सचिव रमेश अभिषेक यांच्या हस्ते राज्यांना ६ श्रेंणींमध्ये रँकींगनुसार प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्याच्या कौशल्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नवउपक्रम संस्थेचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी मिथून जॉन आणि विपणन व्यवस्थापक देवेंद्र नागले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी  केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने घालून दिलेल्या निकषानुसार राज्या- राज्यांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री यांनी ६ फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘स्टार्टअप रँकींग २०१८’ कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी एकूण ७ आधार मानक आणि ३८ कार्यबिंदू ठरविण्यात आले. या आधारावर देशभरातील २७ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधील ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांचा तज्ज्ञ समितींकडून आढावा  घेण्यात आला व परिक्षण करण्यात आले. या आधारावर अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार घालून दिलेल्या निकषावर गुणांकनाच्या आधारे  सर्वोत्तम राज्य, शिर्ष राज्य, आघाडीचे राज्य, आकांक्षी राज्य, उदयोन्मुख राज्य आणि आरंभी राज्य अशा सहा श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. यात महाराष्ट्राचा समावेश उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत करण्यात आला आहे.      
           
            महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यात स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नवउपक्रम या नोडल संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर  या संस्थेचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी मिथून जॉन यांनी सांगितले, महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ मध्ये स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे . केंद्राच्या स्टार्टअप इंडिया रँकींगसाठी मार्च २०१८ हा कालावधी ग्राहय धरून रँकींग देण्यात आली आहे. अल्प कालावधीत राज्याने ही रँकींग मिळविल्याचे सांगत श्री जॉन म्हणाले, राज्यात स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १६ कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. या माध्यमातून स्टार्टअपसाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य पुरविण्यात येते. राज्यात अजून अशा २५ कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत तसेच राज्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे व गुंतवणूक व्हावी यासाठी  राज्याबाहेरील २४ स्टार्टअप्सना परवानगी देण्यात आली आहे. या प्रत्येक स्टार्टअपला महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावर्षीच्या स्टार्टअप रँकींगच्या तुलनेत पुढील वर्षीच्या रँकींगमध्ये राज्याची प्रगती दिसून येईल असा विश्वासही श्री जॉन यांनी व्यक्त केला.                                                                           
   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                   0000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.428/  दिनांक 20.12.2018 














No comments:

Post a Comment