Sunday, 13 January 2019

दिव्यांगांसाठी अधिक सुलभता विस्तारीत करण्याची आवश्यकता



                
नवी दिल्ली,13 :  दिव्यांगांसाठी सर्वच क्षेत्रात अधिक सुलभता विस्तारीत करण्याची आवश्यकता असल्याचा सुर जागतिक पुस्तक मेळयात आयोजित परिसंवादातून निघाला.
32 व्या जागतिक पुस्तक मेळयाचे आयोजन राष्ट्रीय पुस्तक न्यासच्यावतीने प्रगती मैदान येथे दिनांक 5 ते 13 जानेवारी दरम्यान करण्यात आले. आज पुस्तक मेळयाच्या अंतीम दिवशी थीम पॅव्हेलियन क्रमांक 7 ई मध्ये आपलं उद्दीष्ट कसं साध्य करावे ?’ याविषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.  या परिसंवादात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमन, राष्ट्रीय दिव्यांगज पुरस्कार प्राप्त युवा आयकॉन, सी.ए. भूषण तोष्णीवाल,  पॅरा ॲथेलिट सुवर्णा राज यांनी  सहभागी घेतला.  या परिसंवादाची अध्यक्षता दिल्ली शासनाचे , दिव्यांग विभागाचे आयुक्त टी.डी.धारीयाल यांनी केली.
            दिव्यांगांसाठी अधिकाधिक सुलभ वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचा सुर सर्वच सहभागी वक्त्यांनी परिसवांदात मांडला. या अतंर्गत केवळ शासकिय इमारतीच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणे,   दुकाने, हॉटेल्स, सर्वीकडे सुलभता आणने आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. दिव्यांगासाठी सुगम्यता ही केवळ लीफ्ट आणि रॅम्पपर्यंत मर्यादित न राहता याचा आवाका मोठा असायला हवा जागोजागी साईन बोर्ड असायला हवे, अंध दिव्यांगांसाठी ध्वनी संदेशाच्या माध्यमातून सुलभता आणायला हवी, दिव्यांगांसाठीही साहित्य उपलब्धता सहजपणे हवी, विचारांना स्मार्ट बनविणे गरजेचे असल्याच्या  अशा सूचना वक्त्यांनी यावेळी मांडल्या. याशिवाय दिव्यांगांसाठी असणा-या  कायदयाची माहिती जनतेला व्हावी. कायदयाचे पालन न केल्यास होणारा दंड आणि शिक्षा याबाबतही प्रसार प्रचार होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
            उच्च न्यायालयाने दिव्यांगासाठी मार्गदर्शक तत्वे घालुन दिली आहेत. ती तत्व पाळण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड महापालिका करीत असल्याची माहिती श्री पोमन यांनी यावेळी दिली.  पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर स्किपींग लिंक्स, फाँट अँड कलर चेंजींग, प्रायर एचटीएमएल/सीएसएस टॅगींग अँड स्क्रीप्ट व्हॅलीडेशन आदी दिव्यांगाना पुरक सुविधा पुरविण्यात आले .
सोबतच दिव्यांगांना डीजीटल पेमेंट ही सुविधा वापराता यावी यासाठी महापालिका कार्यकरीत आहे. दिव्यांगांना दर महिण्यात शिष्यवृत्ती दिली जाते. दिव्यांगांच्या लग्नासाठी 1 लाख रूपयाचा निधी दिला जातो. दिव्यांगांना उद्योग धंदा उभारण्यासाठी 50 टक्के निधी महापलिका देते. महापलिकेच्या अर्थसंकल्पातील 5 टक्के निधी हा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती ही श्री पोमन यांनी यावेळी दिली. इथेच न थांबतात दिव्यांगजनांचे आयुष्य इतरांसारखेच व्हावे यासाठीही महापालिका प्रयत्नशील राहील, असेही श्री पोमन यावेळी म्हणाले.
            पुण्याचे भुषण तोष्णीवाल यांना 2018 चा युवा आयकॉनया राष्ट्रीय पुस्काराने सन्मानित करण्यात आले.  आतापर्यंतच्या सर्व प्रवासात आपल्या आई-वडिलांनी मोलाची भुमिका निभावल्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले. मी करू शकतो हा मुलमंत्र आपल्या आयुष्यात बाळगण्याच्या सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शास्त्रीय संगीतात त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. चार्टेड अकाऊंट अभ्यासक्रम पार पाडताना अंधत्व असल्यामुळे आलेल्या अडचणींचा कसा सामना करावा लागला याबाबतचे आलेले अनुभव त्यांनी यावेळी मांडले. भुषण तोष्णीवाल यांनी परिसंवाद सुरू होण्या पुर्वी मराठी-हिंदी गाणेही सादर केले.
            मुळची नागपूरची असणारी सुवर्णा राज सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. यांनाही राष्ट्रीय दिव्यागंजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती सुवर्णा या पॅरा ॲथेलिट आहेत. भारत सरकारव्दारे राबविण्यात येणा-या सुगम्य भारत अभियानाच्या अंकेक्षणाचे काम त्या पाहतात. या अंतर्गत शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगासाठी असणा-या सोयी-सुविधांबाबतचा अहवाल त्या सादर करतात. यासोबतच त्या याविषयावर जन-जागृतीही करतात. समाजात दिव्यांगाकडे पाहण्याचा सहानुभूतीपूर्ण असणारा दृष्टीकोण बदलविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
            शनिवारी दिनांक 12 जानेवारीला मराठी गीतांचा कार्यक्रम स्वराजंली प्रस्तुत करण्यात आला. यासोबत ठसकेबाज लावणीही प्रस्तुत करण्यात आली.

No comments:

Post a Comment