Monday, 14 January 2019

महाराष्ट्र शासनाकडून पानिपत युध्द स्माराक विकासासाठी 2 कोटी 58 लाख : पर्यटन मंत्री जयकुमार रावल

 


                                                     
              
नवी दिल्ली/पानिपत,13 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने  हरियाणा राज्यातस्थित ‘पानिपत युध्द स्माराका’च्या विकासासाठी 2 कोटी 58 लाखांचा निधी देण्याची घोषणा आज राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
            पानिपतच्या तिस-या लढाईला यावर्षी 258 वर्ष पूर्ण होत आहेत. या युध्दात अतुल्य शौर्य गाजविणा-या मराठा सैन्याच्या कामगिरीची आठवण म्हणून पुणे येथील हिंदवी स्वराज्य समितीच्यावतीने आयोजित ‘पानिपत शौर्यदिन’ कार्याक्रमात श्री रावल बोलत होते. यावेळी राज्याचे माजी सैनिक कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, तंजावर येथील छत्रपती शिवाजीराजे भोसले, पेशव्यांचे वंशज महेंद्र सिंह पेशवे, अवैश बहादूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            यावेळी रावल म्हणाले, पानिपत युध्द भूमीवर मराठा सैन्याने अतुल्य शौर्य दाखवले. युध्दात पराभव झाला तरी अहमदशहा अब्दालीच्या सैन्यासोबत निकराचा लढा देणा-या  मराठा सैन्याचे योगदान भारतीय इतिहासात मोलाचे ठरले आहे. ज्या युध्द भूमीवर हे युध्द लढले गेले त्या हरियाणा राज्यातील पानिपत येथील कालाआम परिसरातील पानिपत युध्द भूमीच्या विकासाकरिता महाराष्ट्रा शासनाच्या पर्यटन विभागाच्यावतीने 2 कोटी 58लाखांचा निधी देण्याची घोषणा श्री. रावल यांनी यावेळी केली. महाराष्ट्र शासन व हरियाणा शासनाच्यावतीने पानिपत युध्द स्माराकाचा ऐतिहासिक तिर्थस्थळ म्हणून विकास करण्यासाठी विविध कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            श्री. संभाजी पाटील निलंगेकर  यांच्यासह गणमान्य वक्त्यांची यावेळी भाषणे झाली.     
                                              असा पार पडला दिमाखदार सोहळा
                सर्वप्रथम येथील कालाआम परिसातील युध्द स्मारकावर तंजावरचे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी पुष्पचक्र वाहिले. यानंतर महेंद्र सिंह पेशवे आणि अवैश बहादूर यांनी पुष्पचक्र वाहिले. महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून युध्दातील शहिदांना आदरांजली वाहिली.        
            पानिपत शौर्य दिनाच्या मुख्यकार्यक्रमात पानिपतच्या तिस-या युध्दात भगव्या झेंडयाचे रक्षण करण्याचे प्रतिक म्हणून पेशव्यांच्या वंशाजांकडून छत्रपतींना जरी पटका देवून सन्मानित करण्यात आले. तर अतुल्य शौर्याकरिता छत्रपतींकडून पेशव्यांना युध्द सन्मान  प्रदान करण्यात आला. तसेच सरदार घराण्यातील वंशजांना छत्रपतींच्या हस्ते युध्द पदक व जरीपटका देवून सन्मानित करण्यात आले.

            कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदेमातरम’ या राष्ट्रगाणाने तर ‘जनगणमन’ या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी जय ‘भवानी जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. 
                                                                 0000
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                          00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.17/दि.14.01.2019




No comments:

Post a Comment