Monday, 14 January 2019

डॉ.तनुजा नाफडे निर्मित पहिली भारतीय ‘मार्शल धून’ होणार आज देशाला अर्पण



                   महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. नाफडे यांचा सन्मान

              
नवी दिल्ली,13 : नागपूर येथील डॉ. तनुजा नाफडे यांनी तयार केलेली पहिली वहिली भारतीय ‘मार्शल धून’ मंगळवारी ‘लष्कर दिनी’  देशाला समर्पित होणार असून यावर्षी पासून राजपथावरील गणतंत्र दिनी प्रथमच ब्रिटीश मार्शल धून ऐवजी भारतीय धून वाजणार आहे.

            भारतीय लष्कर दिना निमित्त येथे लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या उपस्थितीत मंगळवारी  आयोजित शानदार कार्यक्रमात  पहिल्या वहिल्या भारतीय मार्शल धूनचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज डॉ. तनुजा नाफडे यांचा महाराष्ट्र परिचय केंद्रात सन्मान करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, उपसंपादक रितेश भुयार  आणि ‘तरूण भारत’ चे दिल्ली ब्युरो चिफ शामकांत जहागिरदार यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. नाफडे यांच्याशी झालेल्या औपचारीक गप्पांमधून मार्शल धूनच्या निर्मितीची कथा उलगडली.

                                  लष्काराचे 14 बँड  व 252 कलाकार वाजवणार धून 
            लष्कर दिनाच्या कार्यक्रमात लष्कर प्रमुखांच्या हस्ते लोकार्पण झाल्यावर याच कार्यक्रमात प्रथम आधिकारीकरित्या ही धून वाजविली जाणार आहे. या कार्यक्रमात लष्काराच्या 14 बँडचे एकूण 252 कलाकार ही धून सादर करणार आहेत. समारंभपूर्वक या धुनचे लोकर्पण झाल्यावर यावर्षी पासून राजपथ येथील गणतंत्र दिनासह देशभर होणा-या लष्काराच्या कार्यक्रमात हीच धून वाजविण्यात येणार आहे.
           
         भारतीय लष्कराला पहिली भारतीय धून ; महाराष्ट्र कन्येला धून बनवण्याचा मान
            स्वातंत्र्य प्राप्ती पासून भारतीय लष्कराच्या विविध कार्यक्रमात व भारतीय गणतंत्र दिनी राजपथावर आयोजित करण्यात येणा-या गौरवपूर्ण कार्यक्रमात  आतापर्यंत ब्रिटीश लष्काराची मार्शल धूनच वाजविण्यात येत असे. मात्र, या ऐवजी भारतीय लष्कराची स्वतंत्र भारतीय बनावटीची धून बनविण्याची जबाबदारी भारतीय लष्काराने नागपूर येथील संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांना दिली. डॉ. नाफडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारीत ही धून यशस्वीरित्या तयार केली. डॉ. नाफडे यांच्या माध्यमातून भारतीय मार्शल धून बनविण्याचा पहिला मान महाराष्ट्र कन्येने मिळवला आहे.
                         जगाच्या इतिहासात शास्त्रीय संगितावर आधारीत पहिली धून
       डॉ. नाफडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील  किरवानी, विलासखानी आणि भैरवी या तीन रांगांतील स्वरांची गुंफण करून ही मार्शल धून  तयार केली  आहे. जगाच्या इतिहासात प्रथमच शास्त्रीय संगीतावर आधारीत मार्शल धून बनण्याचा हा पहिला प्रसंग असल्याचे डॉ. नाफडे यांनी सांगितले. भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांसह वेस्टर्न कॉड आणि वेस्टन हार्मनीचीही या धुनला जोड देण्यात आली आहे. मुंबई येथील यशराज स्टुडिओत ही मार्शल धून लाईव्ह रेकॉर्ड  करण्यात आली असून 6 मिनीटांची ही धून असल्याचे डॉ. नाफडे यांनी सांगितले.
                        
                  भारतीय लष्कारासाठी धून तयार करणे माझ्यासाठी भाग्याचे   
        भारतीय लष्कारासाठी स्वत:ची मार्शल धून करण्याची संधी मिळाली व ती यशस्वीपणे पूर्ण केली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते’, अशा कृतज्ञभावना डॉ. नाफडे यांनी व्यक्त केल्या. ही धून तयार करण्यासाठी आपली संगीत साधना फळाला आली अशाही त्या म्हणाल्या.   

                                                                 0000
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                          00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.18/दि.14.01.2019

No comments:

Post a Comment