Thursday, 31 January 2019

डॉ.आंबेडकरांनी सकारात्मक पत्रकारिता केली : थावरचंद गहलोत



 

 


शानदार समारंभात "मूकनायक" पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 31 :  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काम सर्वव्यापी होते, त्यांनी केलेली पत्रकारिता सकारात्मक होती, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज प्रथम मुकनायक सामाजिक पत्रकारितापुरस्कार वितरण समारोहात व्यक्त केले.

येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मूकनायक सामाजिक पत्रकारिता  पुरस्काराचे  वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेबआंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन  केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर,  सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे, विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, खासदार हरीशचंद्र चव्हाण, विकास महात्मे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिशनचे महासंचालक के.जी.सुरेश, महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे  प्रधान सचिव दिनेश वाघमारे व अन्य वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री गहलोत म्हणाले, बाबासाहेब आयुष्यभर सामाजिक समतेसाठी लढले, आवाज नसलेल्या समाजाचा आवाज म्हणून मूकनायक पाक्षिक सुरू केले. त्यावेळी उचलेले क्रांतीकारी पावलाने आजचा समाज घडला आहे. बाबासाहेबांचे सर्वच क्षेत्रात केलेले काम अतुलनीय आहे. बाबासाहेबांचा  सामाजिक समतेचा विचार देशातील अंतीम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम भारत सरकार करीत असल्याचेही श्री गहलोत यावेळी म्हणाले.

सामाजिक समतेची कास धरणा-या चार पत्रकारांना मुकनायक पत्रकारिता पुरस्कार

सामाजिक समतेची कास धरणा-या महाराष्ट्रातील चार पत्रकारांना  मुकनायक सामाजिक पत्रकारिता  पुरस्काराने गौरविण्यात आले. झी 24 तास चे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री कुवळेकर यांनी गाव पातळीवरच्या समस्यांना वाचा फोडली. राज्यातील पाण्याचा प्रश्न मांडला, समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न विजय कुवळेकरांनी केला. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना प्रथम मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने  गौरिवण्यात आले.

पुरस्काराला उत्तर देतांना श्री कुवळेकर म्हणाले,  हा पुरस्कार स्वीकारतांना अंत्यत आनंद होत आहे. बाबासाहेबांनी मांडलेला विचार हा अंतीम माणसाला न्याय, समता देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यात माणूस सर्वात महत्वाचा होता, अशा भावना श्री कुवळेकर यांनी व्यक्त केल्या. पुरस्कार स्वरूप 1 लाख रूपये रोख, शॉल, श्रीफल आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

लोकसत्तेचे सहायक संपादक मधु कांबळे यांनाही, त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून केलेल्या पत्रकारितेसाठी मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देतांना श्री कांबळे म्हणाले, हा पुरस्कार पत्रकारितेशी संबंधित असल्यामुळे स्वीकारतांना आनंद होत आहे. बाबासाहेबांनी लिहीलेली राज्यघटना हीच पत्रकारीतेचा  चौथ्या स्तंभाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले. यांनाही 1 लाख रूपये रोख, शॉल, श्रीफल आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

प्रोत्साहनपर पुरस्कारांमध्ये तरूण भारत वर्तमानपत्राच्या उपसंपादक योगीता साळवी आणि जय महाराष्ट्रवृत्त वाहिनीचे पत्रकार  गोंविद तुपे यांना सन्मानित करण्यात आले.  51 हजार रूपये रोख, शॉल, श्रीफल, आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरिवण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकहे पाक्षिक सुरु केले या घटनेस  १०० वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी  पहिला 'मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार' आज वितरीत करण्यात आला. शोषितांच्या व्यथा आणि आवाज सरकार व जनसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सुरु झालेल्या मूकनायक पाक्षिकाच्या नावाने देण्यात येणार हा पुरस्कार शतकारनंतरही समाजातील शोषितांचा आवाज आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचे काम करणा-या पत्रकारांना देण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब वंचितांचा आवाज बनले : सुरेश प्रभु
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  वंचितांचा आवाज बनुन मुकनायक या पाक्षिकातून मांडत गेले, असल्याच्या भावना केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी व्यक्त केल्या.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेरीत असणारा विचार हा सार्वकालिक आहे. तो विचार रूजविण्याचा प्रयत्न सरकारव्दारे होत असून भविष्यात न बोलताही प्रश्न सुटतील, अशी अशाही श्री प्रभु यांनी व्यक्त केली.
मुकनायक पुरस्कार सामाजिक न्याय रुजविण्यात भर पडणार : राजकुमार बडोले
मुकनायक पुरस्कार सामाजिक न्याय रुजविण्यात भर पडणार,असे प्रतिपादन राजकुमार बडोले यांनी केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे प्रतिक असून त्यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, आंदोलने हे भारतीय समाजाला सदैव प्रेरणादायी राहतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायकाची सुरूवात करून इतिहास घडविला. जगातील प्रतिष्ठीत विद्यापीठात  उच्च शिक्षण घेऊन त्यांनी संपूर्ण जीवन हे सामाजिक न्यायासाठी व्यतीत केले. मुकनायक हे अस्पृश्य समाजासाठी दिपस्तंभ ठरला असून या पाक्षिकाला शंभर वर्षे झाली आहेत. त्यामुळे या पुरस्काराचे विशेष महत्व आहे. या पुरस्कारामुळे सामाजिक न्याय समाजात रूजविण्यात भर पडणार श्री बडोले म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता संशोधन अध्यासन सुरू करणार : के. जी. सुरेश

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी अध्यासन सुरू करणार असल्याची घोषणा, संस्थेचे महासंचालक के.जी. सुरेश यांनी आजच्या कार्यक्रमात केली. बाबासाहेबांनी  सुरू केलेले पाक्षिक मुकनायक पुनर्जिवीत करण्याचे काम आयआयएमसीच्या माध्यमातून केले जाईल, असेही श्री सुरेश म्हणाले. बाबासाहेबांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून मागास समाजात  नवचेतना  जागृत केली होती. बाबासाहेबांचा विचार हा सर्व समावेशी विचार होता. समाजात नवीन विचार देणे ही पत्रकारांची महत्वाची  भुमिका असते. ही भुमिका शंभर वर्षापुर्वी बाबासाहेबांनी दिली होती.  त्याला पुनर्जिवीत करण्याचे काम आयआययएमसीव्दारे केले जाईल, असे श्री सुरेश यावेळी म्हणाले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज्य अहीर,  सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केले, तर आभार बार्टीचे महासंचालक श्री कैलास कणसे यांनी मानले.

No comments:

Post a Comment