Thursday 31 January 2019

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सुरजकुंड मेळयाचे’ आज उद्घाटन गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम यांच्यासह राज्याच्या संस्कृतीचे होणार दर्शन





















नवी दिल्ली, 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे आयोजित 33 व्या ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळयाचे’ 1 फेब्रुवारी 2019 रोजी उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्राला या मेळयाच्या थीम स्टेटचा मान मिळाला असून, महाराष्ट्रातील गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम तसेच महाराष्ट्राचे सण-उत्सव व गौरवशाली परपंरा दर्शविणारे विविध देखावे आणि रेखाचित्रांनी सुरजकुंड सज्ज झाले आहे. या मेळयात राज्याची हस्तकला, व्यंजन व संस्कृती बघायला मिळणार आहे.
सुरजकुंड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत हरियाणा पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा सुरजकुंड मेला प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विजय वर्धन यांनी मेळ्याच्या उद्घाटनाबाबत व संपूर्ण सज्जतेबाबत माहिती दिली .केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी , महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विजय वर्धन यांनी सांगितले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटन मंत्री रामबिलास शर्मा, भारतातील थायलंड चे राजदूत चुटिन टॉर्न गांटा यावेळी उपस्थित राहतील.
सुरजकुंड मेळ्यात अवतरला महाराष्ट्र
या मेळ्याचे मुख्य कार्यक्रम स्थळ असणा-या चौपाल रंगमंचाला ऐतिहासिक रायगड किल्ल्याचे स्वरुप देण्यात आले आहे. येथेच उभारण्यात आलेल्या मातीच्या छोट्या- छोट्या घरांवर हत्तीवर आरुढ छत्रपती शिवाजी महाराज तसेच गडावर लढणारे शूर मावळे चित्ररुपाने दर्शविण्यात आले आहेत. शेजारीच मराठमोळी गुढी उभारण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असणारा आकाशकंदिल या मेळ्यात ठिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. मेळ्याच्या मुख्यद्वाराच्या कडेलाच राज्यातील गड किल्ले यांच्या मोठमोठ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई शेजारील जगप्रसिध्द एलिफंटा गुंफेतील त्रिमृती ही आकर्षकरीत्या सजविण्यात आली आहे. महाराष्ट्राची समृध्द लोककलाही या मेळयात ठिकठिकाणी पहायला मिळणार आहे. वासुदेवाच्या वेशातील कलाकार या मेळयात भेट देणा-या देश-विदेशातील पर्यटकांना जनजागृती पर संदेश देण्यास सज्ज झाले आहेत. तसेच या मेळयात सांस्कृतिक कार्यकम व मनोरंजानासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कट्टयावर महाराष्ट्रातील कलाकार भारूड, लावणी आदि लोककलाही सादर करणार आहेत.
महाराष्ट्राने केले देशाचे संरक्षण – विजय वर्धन
यावर्षीच्या सुरजकुंड मेळ्याची थीम स्टेट असणारे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य असून इतिहासात देशाच्या संरक्षणासाठी या राज्याने घेतलेला पुढाकार चिरस्मरणीय आहे. भारत देशाच्या संरक्षणासाठी दोन लाख मराठा सैनिक हजारो मैल हरियाणातील पानीपत येथे अहमदशाह अब्दालीचा सामना करण्यासाठी आले होते. या लढाईत मराठ्याचा पराभव झाला मात्र देश संरक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान अन्नय् साधारण असल्याचे विजय वर्धन यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर दक्षिण हरियाणात मराठ्यांचे राज्य होते हा गौरवशाली इतिहास असलेला महाराष्ट्र 33 व्या सुरजकुंड मेळ्याचे थीम स्टेट आहे. सतरा दिवस चालणा-या या मेळ्यात महाराष्ट्राची हस्तकला, व्यंजन आणि वैविध्यपूर्ण संस्कृती देश व जगातील पर्यटकांना अनुभवायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरजकुंड मेळयाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती देश व जगात पोहचेल :विनीता सिंघल
या मेळयात महाराष्ट्राचे 75 स्टॉल्स उभारण्यात आले असून सर्वोत्तम 100 हस्तकलाकार विविध हस्तकलेच्यावस्तू विक्रीसाठी ठेवणार आहेत. राज्यातील 100 कलावंताचा चमू येथे दाखल झाला असून हे कलाकार महाराष्ट्राची वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण व मर्दानी खेळांचे प्रात्याक्षिक दाखविणार आहेत. राज्याचे वैशिष्टयपूर्ण खाद्यपदर्थही याठिकाणी येणा-यांना चाखायला मिळणार आहेत. या मेळयाच्या माध्यमातून महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती व पर्यटन स्थळ देश व जगात पोहचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेळयात मुख्य चौपालावर दररोज सायंकाळी विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून महाराष्ट्राला महत्वाचे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा देण्यात आली आहे. मेळाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण सांस्कृतिक वारशासह ‘शिवाजी महाराजांचा गनीमा कावा’ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. 7 व 9 फेब्रुवारी रोजीही महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतिचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय या सर्व कार्यक्रमाचे संयोजन व समन्वय करणार आहे.
सुरजकुंड मेळा प्राधिकरण व हरियाणा राज्य पर्यटन विभाग, केंद्र शासनाचे पर्यटन विभाग, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक विभाग, परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्या संयुक्त् विद्यमाने 1 ते 17 फेब्रुवारी 2019 दरम्यान 33 व्या सुरजकुंड मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील 29 राज्य् आणि 7 केंद्रशासित प्रदेश तसेच एकूण 30 देश या मेळयात सहभागी होत आहेत. या मेळयात थायलंडला सहयोगी देशाचा मान मिळाला आहे.

No comments:

Post a Comment