Friday, 22 February 2019

बृह्नमुंबई मनपाला ‘डिजीटल इंडिया’ पुरस्कार




नवी दिल्ली दि. 22 :  सर्वोत्तम डिजीटल सेवा पुरविल्याबद्दल बृह्नमुंबई महानगर पालिकेला आज केंद्रीय इलेक्ट्रॉनीक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ‘डिजीटल इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            येथील इंडिया हॅबीटॅट सेंटर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरतर्फे ‘डिजीटल इंडिया पुरस्कार-२०१८’ वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. एकूण १० श्रेणींमध्ये यावेळी देशातील विविध शासकीय विभागांना सर्वोत्तम डिजीटल सेवांसाठी सन्मानित करण्यात आले.केंद्रीय इलेक्ट्रॉनीक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अजय सहानी, राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुल्शन राय, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या संचालक डॉ. निता वर्मा यावेळी उपस्थित होत्या.

            स्थानिक स्वराजय्‍ संस्थेच्या श्रेणीत बृह्नमुंबई महानगर पालिकेला सर्वोत्तम डिजीटल सेवा पुरविल्याबद्दल रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बृह्नमुंबई महानगर पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक अरूण जोगळेकर आणि व्यवसाय विभागाच्या प्रमुख शशीबाला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.             

                                    बृह्नमुंबई मनपाच्या सर्व सेवा  डिजीटल रूपात एकाच ठिकाणी    
       
अर्जदाराला महानगर पालिकेल्या एखाद्या विभागात आवश्यक असलेली परवानगी किंवा नोंदणी करण्याची सोय मनपाच्या संकेतस्थळावरच ‘एकल खिडकी’ योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी वॉर्ड स्तरावर अशी परवानगी व नोंदणी करावी लागत असे. संकेतस्थळावर नवीन उद्योग उभारणीसाठी अर्ज करण्यापासून विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  परवणग्यांचे विविध टप्पे व त्याची सद्य:स्थिती अर्जदाराला संकेतस्थळावरच बघायला मिळते.

यासेवांसोबतच जन्म व मृत्यु नोंदणी, लग्न नोंदणी, फॅक्ट्री  परवाना, मनपाला ऑनलाईन रक्कम भरणे, व्यवसाय परवाना, नक्कल परवना इत्यादी सेवा संकेतस्थळावरच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संकेतस्थळावर तक्रार, रोजगार संधी, नागरीक मंच असा स्वतंत्र विभागही उपलब्ध आहे. इतिहास, संस्कृती आणि पर्यटन आदींविषयीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून ही माहिती सर्व सामान्य जनतेला सहज उपलब्ध होते.  
डिजीटल इंडिया पुरस्काराविषयी
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरतर्फे वर्ष २०१० पासून दर दोन वर्षांनी डिजीटल इंडिया पुरस्कार दिले जातात. यंदाचे हे पुरस्कारांचे पाचवे वर्ष आहे. डिजिटलकरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी विभागांचा या पुरस्कारांद्वारे सन्मान करण्यात येतो.
उदयोन्मुख तंत्रज्ञान, सर्वोत्तम मोबाईल ॲप, सर्वोत्कृष्ट ऑनलाइन सेवा, ओपन डेटा चॅम्पियन, वेब रत्न-मंत्रालय / विभाग, वेब रत्न-राज्य / केंद्रशासित प्रदेश, वेब रत्न-जिल्हा, स्थानिक प्राधिकरणाचा सर्वोत्तम डिजिटल उपक्रम, उदयोन्मुख तंत्रज्ञान अशा वर्गवारीत हे पुरस्कार दिले  जातात.

No comments:

Post a Comment