Saturday, 16 February 2019

महाराष्ट्र सदनातील अभिरूप मुलाखती ; राज्यातील उमेदवारांचा उत्तम प्रतिसाद







                       आतापर्यंत 40 उमेदवारांनी घेतला लाभ

नवी दिल्ली, 16 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीत राज्यातील उमेदवारांनी घवघवीत यश मिळवावे या उद्देशाने येथील महाराष्ट्र सदनात राज्य शासनाच्यावतीने सुरु असलेल्या अभिरूप मुलाखतीस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 40 उमेदवारांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने वर्ष 2018 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्यपरिक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 2 फेब्रुवारी 2019 पासून अभिरूप मुलाखती घेण्यात येत आहेत. वर्ष 2015 पासून दिल्लीत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा राज्यातील 477 उमेदवारांनी लाभ घेतला असून त्यातील 170 उमेदवार सद्य: केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये कार्यरत आहेत.

                                                अशी पार पडते अभिमरूप मुलाखत
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर होताच त्यांच्या मुलाखती प्रत्यक्ष सुरु होण्याच्या एक आठवडा आधी दरवर्षी महाराष्ट्र सदनात अभिमत मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती 11 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत असणार आहेत. त्याअनुषंगाने  2 फेब्रुवारी ते 17  मार्च असा अभिरूप मुलाखतीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
आठवडयाच्या शनिवार व रविवार अशा दोन दिवस या मुलाखतींचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक दिवशी 10 उमेदवार या उपक्रमाचा लाभ घेतात तर मुलाखत पॅनल मध्ये केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये कार्यरत मराठी अधिकारी सहभागी होतात. दिवसाला 5 अधिका-यांचे एक असे एकूण दोन पॅनल या मुलाखती घेतात यासोबतच प्रसारमाध्यम व सामाजिक कार्य या विषयातील तज्ज्ञही पॅनलमध्ये असतात. प्रत्येक उमेदवाराला 40 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. यात 30 मिनिटे मुलाखत आणि उर्वरीत 10 मिनिटांमध्ये उमेदवाराने भाषा, विषयाची मांडणी, देहबोली आदिंबाबत घ्यावयाची काळजी व अन्य उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येते. यावर्षी आतापर्यंत राज्यातील 40 उमेदवारांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

                                 मुलाखतीत मिळते योग्य दिशा व मार्गदर्शन

       राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये कार्यरत अधिका-यांकडून शासकीय सेवितील प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे प्रश्न विचारण्यात येतात. विचारलेल्या प्रश्नांचे अपेक्षित उत्तर काय असावे तसेच प्रश्नाच्या उत्तरात कोणत्या बाबी टाळाव्या आदींचे नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येते. या मुलाखतीतून उमेदवारांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळत असल्याच्या भावना या उपक्रमाचा वर्ष 2015 मध्ये प्रत्यक्ष लाभ घेतलेले आणि सद्य: आयकर विभागात कार्यरत व आज या मुलाखत पॅनलमध्ये सहभागी झालेले मेघनाथ गावित यांनी  व्यक्त केल्या.  

या उपक्रमात आज मुलाखत दिल्यानंतर नाशिक येथील नवजीवन पवार यांनी सांगितले, मुलाखत पॅनलवरील अधिका-यांनी खरी टिप्पणी दिली व काही चुकांही लक्षात आणून दिल्या. येत्या सात दिवसात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीस सामोरे जाणार आहे.अभिरूप मुलाखतीच्या माध्यमातून दिल्लीत मराठी अधिका-यांकडून योग्य मार्गदर्शन व दिलासा मिळतो त्याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रत्यक्ष मुलाखतीत निश्चितच फायदा होईल असा विश्वास नाशिक येथील नवजीवन पवार यांनी व्यक्त केला.  

पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव श्री श्रीकर परदेशी, दिल्ली पोलीस मध्ये वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांचे विशेष मार्गदर्शन सत्रही या उपक्रमांतर्गत झाले. येत्या 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड मध्ये कार्यरत वरिष्ठ अधिकारी प्रमोद फणसीकर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती नागपूर स्थित भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक तथा अभिरूप मुलाखत उपक्रमाचे समन्वयक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली.                       
                        आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                       00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.72/दि.16.02.2019





No comments:

Post a Comment