Tuesday, 5 March 2019

प्रा. वामन केंद्रे यांना बी.व्ही.कारंथ पुरस्कार जाहीर



                     प्रा.केंद्रे यांनी मिळवला एनएसडीचा तिहेरी बहुमान

नवी दिल्ली,  : राष्ट्रीय नाटय विद्यालयाचावतीने (एनएसडी) नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा ‘बी.व्ही. कारंथ पुरस्कार’  प्रसिध्द नाटयकर्मी  व एनएसडीचे माजी संचालक  प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारामुळे एनएसडीतून शिक्षण पूर्ण करून याच संस्थेचे प्रमुख होण्याचा बहुमान व याच संस्थेचे मानाचे दोन पुरस्कार पटकविण्याचा विक्रमच प्रा. केंद्रे यांनी केला आहे.
            केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत नाटय क्षेत्रातील देशात सर्वोत्तम संस्था म्हणून नावलौकीक असणा-या एनएसडीच्यावतीने वर्ष 2016 च्या बी.व्ही.कारंथ पुरस्कारासाठी प्रा.वामन केंद्रे यांची निवड केली आहे. एनएसडी आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान व्हावा म्हणून याच संस्थेचे पूर्व संचालक व भारतीय रंगभूमीवरील कलावंत बी.व्ही.कारंथ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व त्यांच्याच नावाने वर्ष २००४ पासून हा पुरस्कार प्रदान करते. पन्नास वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या माजी मात्तबर कलाकराला हा पुरस्कार दिला जातो.  यावर्षी  प्रा. वामन केंद्रे यांच्या कार्याची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे. १ लाख रुपये सम्मान चिन्ह सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या महिन्याच्या शेवटया आठवडयात एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
                                   प्रा. केंद्रें यांनी ‘मनोहर सिंग स्मृती पुरस्कारही’ पटकाविला
एनएसडीतून शिक्षण पूर्ण करणा-या पन्नास वर्षाखालील माजी गुणी युवा विद्यार्थ्याला मनोहर सिंग स्मृती पुरस्कार दिला जातो. प्रा. केंद्रे यांनी २००४ मध्ये या पुरस्कारावरही आपली नाममुद्रा कोरली आहे. मनोहर सिंग स्मृती पुरस्कार हा एनसडीच्या युवा माजी विद्यार्थ्यांच्या कामाचा सन्मान व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने देण्यात येतो. प्रा. केंद्रे यांनी एनएसडीचे  दोन्ही पुरस्कार पटकावून  एनएसडीच्या इतिहासातील पहिले कलावंत  होण्याचा मान मिळवला आहे.

प्रा. केंद्रे यांचे नाटयक्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे त्यांच्या  योगदानाची दखल घेवून नुकतेच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. वर्ष २०१२ मध्ये त्यांना नाटय अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.  प्रा. केंद्रे यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरील कार्य अजोड आहे. एनएसडी चे संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली आहे. २०१८ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतामघ्ये जगातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव ८ वे थिएटर ऑलम्पिक्स मोठ्या दिमाखात यशस्वीरित्या आयोजित पार पडला. एवढ्या मोठ्या स्तरावर असा महोत्सव आयोजित करण्याचा मान भारताला पहिल्यांदाच मिळाला. त्यांच्या या कार्याचा गौरव संपूर्ण भारतातूनच नव्हे तर जगभरातून करण्यात आला होता.
                                     
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                       
                                           0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 89 / दिनांक  05.03.2019




No comments:

Post a Comment