Thursday 30 May 2019

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाची शपथ









महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट  व 3 राज्यमंत्री
नवी दिल्ली दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रीमंडळास आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.  या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.
             राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वंतत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री  यांचा समावेश आहे. यावेळी  ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह  विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.    
महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री
श्री. नरेंद्र मोदी  यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.   तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.
याआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पियुष गोयल यांनी उर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून मंत्रीपद भुषवीले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भुषवीले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली  आहे.   
           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi                                       000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.123/  दिनांक  ३०.०५.२०१९ 

No comments:

Post a Comment