Monday, 17 June 2019

महाराष्ट्रातील 46 खासदारांनी घेतली लोकसभा सदस्यपदाची शपथ श्री.नितीन गडकरी यांच्यासह चार मंत्र्यांचीही शपथ







नवी दिल्ली, : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित 46 खासदारांनी आज 17 व्या लोकसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली.  यात महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कार्यरत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अरविंद सावंत यांच्यासह  रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे या राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली.
            १७ व्या लोकसभेच्याही पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोसभेत नव्याने निवडूण आलेल्या सदस्यांनी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री  राजनाथसिंह यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य  आणि संसदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी  शपथ घेतली  यात महाराष्ट्रातून दोन केंद्रीय मंत्री आणि दोन राज्यमंत्र्याचा समावेश आहे.
            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक रस्ते विकास मंत्री तथा सूक्ष्म,लघु मध्यम उद्योग मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार नितीन गडकरी  तसेच अवजड उद्योग मंत्री तथा दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार अरविंद सावंत यांनी  लोसभा सदस्य पदाची शपथ घेतली. केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न पुरवठा सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब  दानवे  आणि दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स माहिती-तंत्रज्ञान    मनुष्यबळ विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय धोत्रे यांनीही  लोकसभा सदस्य पदाची शपथ घेतली. 
34 खासदारांनी मराठीतून घेतली शपथ
लोकसभा सदस्य पदाची शपथ घेणा-या महाराष्ट्रातील 34 खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली तर 7 खासदारांनी हिंदीतून, 3 खासदारांनी संस्कृतमधून तर 2 खासदारांनी इंग्रजीतून शपथ घेतली.  

            मराठीतून शपथ घेणा-या खासदारांमध्ये सर्वश्री. अरविंद सावंत, रावससाहेब दानवे पाटील,डॉ. सुभाष भामरे, रक्षा खडसे, प्रतापराव जावध, नवनीत राणा, रामदास तडस, सुरेश धानोरकर, भावना गवळी, हेमंत पाटील, प्रतापराव चिखलीकर, संजय जाधव, इम्तीयाज जलील, डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे, राजेंद्र गावीत, कपील पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे,  राजन विचारे, , गजानन किर्तीकर, मनोज कोटक, राहूल शेवाळे, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, सदाशिवराव लोखंडे, डॉ. प्रितम मुंडे, ओमप्रकाश पवन राजेनिबांळकर, डॉ.जय सिध्देश्वर स्वामी, रणजितसिंह नाईक निबांळकर, संजयकाका पाटील, विनायक राऊत, संजय मंडलिक आणि धैर्यशिल माने यांचा समावेश आहे.  

            हिंदीतून शपथ घेणा-या खासदारांमध्ये सर्वश्री नितीन गडकरी, संजय धोत्रे, डॉ. हिना गावीत, पूनम महाजन, गोपाल शेट्टी, सुप्रिया सुळे, सुधाकर श्रृंगारे यांचा समावेश आहे. तर उन्मेश पाटील,सुनील मेंढे आणि गिरीष बापट यांनी  संस्कृतमध्ये आणि डॉ. सुजय विखे पाटील व उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

    खासदार  सर्वश्री कृपाल तुमाणेआणि अशोक नेते अनुपस्थित असल्याने आज शपथ घेऊ शकले नाहीत.  
           
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :                    http://twitter.com/micnewdelhi                                              
                                             000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.136/  दिनांक  17.6.2019 

No comments:

Post a Comment