Saturday 12 October 2019

सरस आजिवीका मेळाव्यात महाराष्ट्राच्या हस्तकला व व्यंजनांची रेलचेल














              जावळी घोंगडी, काळा तांदूळ आणि पुरणाचे मांडे खास आकर्षण

नवी दिल्ली दि. १२ : सरस आजिवीका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांच्या स्टॉल्सवरील हस्तकलेच्या वस्तू आणि खास महाराष्ट्रीय व्यंजनांची मोठी रेलचेल दिसून येत आहे. वैशिष्टयपूर्ण जावळी घोंगडी, काळा तांदूळ आणि पुरणाचे मांडे येथे भेट देणा-यांचे खास आकर्षण ठरले आहे.

             केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘दिनदयाल उपध्याय अंत्योद-राष्ट्रीय आजिवीका योजनेंतर्गत’ येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर 10 ते 23 ऑक्टोबर 2019 दरम्यान सरस आजिवीका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या हस्ते या मेळाव्याचे आज उद्घाटन झाले. विभागाचे सचिव अमरजित सिन्हा आणि अतिरीक्त सचिव उपमा चौधरी यावेळी मंचावर उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आणि दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यावेळी उपस्थित होते.

 या मेळाव्यात देशातील 29 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील एकूण 500 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या ‘राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाअंतर्गत’ (उमेद) कार्यरत राज्यातील 10 महिला बचत गटांनी या मेळाव्यात  सहभाग घेतला आहे.

                                                   जावळी घोंगडीने घातली भुरळ      
        या मेळाव्यातील हॉल क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्राच्या हस्तकला व खाद्यपदार्थांची स्टॉल्स आहेत. यात पुणे जिल्हयातील इंदापूर येथील हिरकणी बचत गटाने उभारलेला विविध घोंगडयांचा स्टॉल्स येथे भेट देणा-यांचे आकर्षण ठरला आहे. या स्टॉल वरील जावळी घोंगडी ही पाठ दुखी, मनक्यांचे दुखने यात फायदेशीर असून रक्ताभिसरणासाठीही ही उत्तम मानली जाते. मेंढीच्या लोकरीपासून निर्मित चार प्रकारच्या घोंगडया याठिकाणी विक्रीसाठी  ठेवण्यात आल्या  आहेत.
            
चंद्रपूर जिल्हयातील नागभिड तालुक्याच्या चिंधीचक गावचा वैष्णवी बचतगटावरील काळा तांदूळ येथील खास आकर्षण आहे. ॲसिडीटी, मधुमेह आणि हृदय विकार या आजारासाठी काळा तांदूळ उपयुक्त असल्याने याची मागणी मोठया प्रमाणात दिसून येते. ब्राऊन तांदूळ, सुंगधी मोहरा आणि चकोरा तांदूळही या स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे.

            या हॉलमध्ये नंदुरबार येथील दशमा बचतगट, वर्धा येथील उद्योगिनी बचतगट आणि सातारा जिल्हयातील वाई येथील संस्कृती बचत गटांनी वैविद्यपूर्ण मसाले, पापड आणि डाळींपासून निर्मित खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत.  
                                    पुरणाचे मांडे ठरले खवय्यांचे आकर्षण
         
या मेळाव्यातील फुड कोर्टमध्ये खवय्यांसाठी महाराष्ट्रीय लज्जतदार व्यंजनांची खास मेजवाणीच आहे. येथे रत्नागिरी येथील जिजामाता बचतगट आणि नाशिक जिल्हयातील निफाड येथील माऊली बचतगट यांचा  खास महाराष्ट्रीय व्यंजनांचा स्टॉल असून येथील पुरणाचे मांडे खवय्यांचे आकर्षण ठरले आहे. यासोबतच पुरण पोळी, वडापाव, थालीपीठ, भेळ, सोलकडी, पोहे, उकडीचे मोदक, प्रॉन मसाला, चिकन पकोडा, फिश फ्राय आदी जिन्नस याठिकाणी  खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.
             
 या मेळाव्यातील हॉल क्रमांक एक मध्ये महाराष्ट्रातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध कला कुसरीच्या वस्तुंचे स्टॉल्स आहेत. यात  गडचिरोली जिल्हयातील धानोरा तालुक्याच्या मोहली गावचा शारदा बचतगट, भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्याच्या आंधळगाव येथील यशस्वी बचतगट,धुळे जिल्हयातील फागणे गावचा राधाकृष्ण बचतगट, औरंगाबाद जिल्हयातील पैठण तालुक्याच्या म्हारोंलागावचा रेणुका बचतगट, नाशिक जिल्हयातील येवला तालुक्याच्या नेऊरगाव येथील श्रीगणेश बचतगटाचा स्टॉलही येथे मांडण्यात आला आहे.

            दरम्यान, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा आणि अतिरीक्त सचिव उपमा चौधरी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी या मेळाव्यातील महाराष्ट्राच्या महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट दिली.  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.231 / दि.11.10.2019






No comments:

Post a Comment