Friday 22 November 2019

दिवाळी अंकांची समृध्द संस्कृती जपण्याचे उत्तम कार्य परिचय केंद्र करीत आहे : उपायुक्त संदीप माळवी









             
              महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 22 : महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृध्द संस्कृती राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगर पालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी आज येथे काढले.
            श्री. माळवी यांच्या हस्ते आणि अनिवासी भारतीय ॲड. प्रणिता देशपांडे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी श्री. माळवी यांनी हे विचार मांडले.    परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  श्री माळवी आणि श्रीमती देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            शिक्षण, आरोग्य, राजकारण, महिला, बालक, तरूण, चित्रपट अशा विविध विषयांना वाहिलेली सकस दिवाळी अंक मराठी भाषेत प्रक्राशित होतात. ही दिवाळी अंकाची मेजवाणी परिचय केंद्र मराठी वाचकांना राजधानी दिल्लीत उपलब्ध करून देते, दिवाळी अंकांची समृध्द संस्कृती या निमित्ताने जपली जाते ही गौरवाची बाब असल्याचे श्री. माळवी यांनी सांगितले.

            ॲड. देशपांडे म्हणाल्या, मराठी भाषेतील वैविद्यपूर्ण वांड:मय दिवाळी अंकांच्या रूपात वाचकांना एकत्रित वाचायला मिळते.हा साहित्यिक ठेवा वाचकांपर्यंत पोचविण्याची परिचय केंद्राची दीर्घ पंरपरा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. परिचय केंद्रात असलेल्या हस्तलिखीत दिवाळी अंकांचे डिजीटायजेशन केल्यास आम्हा परदेशातील मराठी जणांनाही हे दुर्मीळ अंक वाचायला मिळतील अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


                                          प्रदर्शनात 125 दिवाळी अंकांची मेजवानी  

      या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज,  मिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, अक्षरधारा, तारांगण, कालनिर्णय, उत्तम कथा, निरंजन, अन्नपुर्णा, लोकसत्ता, महाराष्ट्रटाईम्स,लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ,तरूण भारत,  प्रभात, झी मराठी आदी 125  दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २५५ /  दिनांक 22/11/2019     





No comments:

Post a Comment