Tuesday, 3 December 2019

महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना ‘स्वच्छता रँकींग पुरस्कार’



                  महाविद्यालयांनी पटकाविले पहिले तीन पुरस्कार

नवी दिल्ली, 3 : महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना आज तिस-या ‘स्वच्छता रँकींग’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये पहिले तीनही पुरस्कार राज्यातील महाविद्यालयांनी पटकाविले आहेत. 
              केंद्रीय मनुष्यबळ  विकास मंत्रालयाच्यावतीने येथील  एआयसीटीई  सभागृहात  आयोजित सभारंभात आज मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर. सुब्रमन्यम यांच्या हस्ते ‘स्वच्छता रँकींग पुरस्कार’  प्रदान करण्यात आले.
स्वच्छ भारत’ कार्यक्रमांतर्गत स्वच्छ शैक्षणिक परिसर ठेवण्याच्या उद्देशाने देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता रँकींग’ पुरस्कारामध्ये देशातील 27 विद्यापीठ आणि 20 महाविद्यालयांना एकूण 8 श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
           
                                    राज्यातील तीन महाविद्यालयांनी राखले अग्रक्रम
          देशातील महाविद्यालयांना चार श्रेणींमध्ये ‘स्वच्छता रँकींग’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मान्यता प्राप्त अनिवासी (विनावसतीगृह) महाविद्यालयांच्या श्रेणीत पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले. नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटला दुस-या क्रमांकाच्या तर पुण्यातील निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत एकूण  5 महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  
                        
                                      पहिल्या 10 मध्ये राज्यातील 2 विद्यापीठ
        विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता प्राप्त निवासी (वसतीगृह) विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण 10 विद्यापीठांना स्वच्छता रँकींग पुरस्काराने गौरविण्यात आाले. महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांना या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत पुणे येथील सिंबायोसिस आंरराष्ट्रीय विद्यापीठाला तिस-या क्रमांकाचा तर याच शहरातील डॉ. डि .वाय.पाटील विद्यापीठाला 9 व्या क्रमांकांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
            विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता प्राप्त अनिवासी (विनावसतीगृह) विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण 5 विद्यापीठांना स्वच्छता रँकींग पुरस्काराने गौरविण्यात आाले. यात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला चौथ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वच्छता रँकींग  पुरस्काराचे हे तीसरे वर्ष असून देशभरातील 6 हजार 900 शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.   
    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.262/  दिनांक 03.12.2019 






No comments:

Post a Comment