Saturday, 7 December 2019

रत्नागिरीचा चैतन्य परब आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात दुसरा


                            आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार

नवी दिल्ली, दि. 7 : रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 17 डिसेंबर रोजी  दिल्ली येथे आकाशवाणीच्या  विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            आकाशवाणीच्यावतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देशपातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची  दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.

या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकीत शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची  द्वितीय क्रमांकासाठी निवड केली.

चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात 11व्या इयत्तेत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई  विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे.  

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :               http://twitter.com/micnewdelhi
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.264/  दिनांक  ०७.१२.२०१९ 



No comments:

Post a Comment