Friday, 17 January 2020

महाराष्ट्र एनएसएसच्या 14 विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव








नवी दिल्ली, दि. 17: प्रजासत्ताकदिनी राजपथावरील पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थीनी दिल्लीत सराव करीत आहेत. 

     यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये 1 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएसचे विद्यार्थी- विद्यार्थीनी या शिबिरात सहभागी झाले आहेत. पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1  विद्यार्थीनी असे एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थीनी  या शिबीरात सराव करीत आहेत.

            हे शिबीर 31 जानेवारी 2020 पर्यंत चालणार असून यामध्ये दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत  योगासने, बौध्दीक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येतो अशी  माहिती शिबिराचे संचालक डॉ. अशोक श्रोती यांनी दिली. ‘एक भारत श्रेष्ठ भारतया केंद्र शासनाच्या कार्यक्रमांतर्गत शिबिरामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी  यांच्या राहण्याची व्यवस्था एकत्र करण्यात आली असून उभय राज्यांतील सांस्कृतिक, सामाजिक आदिं विषयी माहिती समजून घेण्यात त्यांना मदत होणार  असल्याचेही  डॉ. श्रोती यांनी सांगितले.

            महाराष्ट्राच्या चमुत पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची वैष्णवी पटोले, औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची तेजस्वीनी वानखेडे, मुंबई येथील  एस.बी. वर्तक महाविद्यालयाची संप्रिती जयंता, मुंबई येथील एस.आय..एस. कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची नितीशा कदम, औंरगाबाद जिल्हयातील वाळुज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाची  पुजा पवार, अकोला येथील श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाची सपना सुरेश, मुंबई येथील ठाकूर वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची अक्षता कदम या विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर मुंबईच्या विरार (पश्चिम) येथील विवा महाविद्यालयाचा पार्थ जानी आणि चर्चगेट येथील के.सी. महाविद्यालयाचा प्रशांत चौधरी, परभणी येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचा पोहनदास तिडके, कोल्हापूर येथील न्यू कॉलेजचा कौस्तुभ लवाटे, औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालयाचा रवी जामनीक, परभणी येथील श्री. शिवाजी महाविद्यालयाचा महेश रेंगे आणि बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचा आदित्य माळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
               
            यासोबतच गोव्यातील मापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाची स्वामीनी लोटलीकर या विद्यार्थीनीचा आणि मडगाव येथील श्री. दामोदर अर्थ वाणिज्य महाविद्यालाच्या प्रेमकुमार सिंह या विद्यार्थ्याचा या चमुत समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण 200 पैकी 148 विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे 16 विद्यार्थी- विद्यार्थीनीची निवड होईल असा विश्वास महाराष्ट्राच्या चमुचे समन्वयक तथा लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सतोंष पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांना हे एनएसएसचे विद्यार्थी-विद्यार्थीनी भेटणार असून यावेळी सादर होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील  विद्यार्थी-विद्यार्थीनींची  निवड  होईल, असा विश्वास प्राध्यापक डॉ. सतोंष पाटील  यांनी व्यक्त केला.
                                        
महाराष्ट्र एनएसएसची गौरवशाली परंपरा
 
              प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात गेल्या एका दशकापासून राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी ,आसीफ शेख आणि दर्पेश डिंगर यांनी मिळविला आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                  00000

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 12/  दिनांक 17.1.2020









No comments:

Post a Comment