Wednesday, 1 January 2020

मराठी भाषेचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

                      
 

 

 

                     





                               मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 1 : मराठी भाषेत मोठी वैचारीक संपदा असून या भाषेचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आजमराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

            महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने 1 ते 15 जानेवारी 2020 दरम्यानमराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असून आज महाराष्ट्र सदनात डॉ. मुळे यांच्या हस्ते पंधरवडाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते.

             यावेळी डॉ.मुळे म्हणाले, महाराष्ट्राचे भौगोलिक व सांस्कृतिक वैविद्य जपत मराठी भाषेत मोठी वैचारीक संपदा निर्माण झाली  आहे. या भाषेने विविध लोककलांना जन्म दिला, या भाषेत नाटक,कविता असे अनेकानेक साहित्य लिहील्या गेले असून ही वैचारीक संपदा जपत मराठीचे  वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस हा या भाषेचा दूत आहे म्हणून हे वैभव वाढविण्यात  त्याची  महत्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.

            महाराष्ट्राबाहेर जिथे-जिथे मराठी माणसं आहेत तिथे त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून मराठी  भाषेच्या संवर्धनात सहभाग घेतला पाहिजे. मराठी सोबतच देशातील अन्य भाषांतील साहित्यांचीही देवाण घेवाण या निमित्ताने व्हावी असेही  डॉ. मुळे म्हणाले

              भाषिक गैरसमजामुळे आपल्याला पाश्चात्यांच्या भाषा आपल्या भाषांपेक्षा महत्वाच्या वाटायला लागतात. मुख्यत्वे  इंग्रजी भाषा बोलता आली की नोकरी मिळते आणि इंग्रजी जगभर बोलली जाते हा मोठा गैरसमज आहे. आपल्याला मातृभाषाच चांगली बोलता यायला हवी. तसेच, इंग्रजी भाषा जगभर बोलली जात नाही. जपान मध्ये जपानी, जर्मनी मध्ये जर्मन, फ्रांस मध्ये फ्रेंच, आफ्रिकन देशांमध्ये फ्रेंच किंवा स्पॅनिच भाषा बोलली जाते. अशात आपण मात्र, गैरसमजाला बळी पडतो परिणामी आपण आपल्या भाषेपासून दूर जातो असेही डॉ. मुळे यांनी सांगितले.

          जगातल्या 50 टक्के भाषा या भारतीय उपखंडात पसरलेल्या असून या भाषांनी आपले वैविद्य जपले आहे. भाषेतील वैविद्यामुळे  नवनवीन कल्पनांचा जन्म होतो आणि भाषेतील वैविद्य गेले तर जग निरस होईल  . प्रत्येक  भाषेत  ज्ञान  ओतप्रोत  भरले असून  भाषिक  देवाण-घेवाणीने ते अधिक समृध्द होते असेही डॉ. मुळे म्हणाले.

            निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपसंपादक रितेश भुयार  यांनी सूत्रसंचालन केले.

                                                          दिवाळी अंकांचे प्रदर्शन

          मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने  महाराष्ट्र सदनात दिवाळी अंकांच्या प्रदर्श लावण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाजमिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, अक्षरधारा, तारांगण, कालनिर्णय, उत्तम कथा, निरंजन, अन्नपुर्णा, लोकसत्ता, महाराष्ट्रटाईम्स,लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ, तरूण भारत, प्रभात, झी मराठी आदी 125 दिवाळी  अंक मांडण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य, महाराष्ट्र अहेडही या प्रदर्शनात मांडण्यात  आले.

यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि महाराष्ट्र परिचय  केंद्राचे उपसंचालक  दयानंद कांबळे उपस्थित होते.
000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. ०१ दिनांक  01/01/2020     


             



No comments:

Post a Comment