नवी दिल्ली, दि. 21 : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने
मिळावा तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली.
मुख्यमंत्री
पदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांची 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर
त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या 15, सफदरजंग लेन या निवासस्थानी पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. यावेळी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, खासदार
संजय राऊत आणि खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री
ठाकरे म्हणाले, जीएसटीचा राज्याच्या वाट्याचा परतावा मिळावा यासाठी
प्रधानमंत्र्यांना याआधी पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्याला हा परतावा मिळाला. मात्र,
हा परतावा जलदगतीने मिळावा अशी विनंती प्रधानमंत्र्यांना केली. याबाबत केंद्र
पूर्ण सहाकार्य करेल अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच,
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा यावरही
चर्चा झाली. सध्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा उतरविण्यासाठी
कंपन्या आल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे चित्रही
प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य मिळेल
विविध प्रगतीशील
कामे व योजनांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री
झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनीवरून मला शुभेच्छा दिल्या होत्या. आज
मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतील पहिल्या भेटीतच प्रधानमंत्र्यांची सदिच्छा भेट
घेतली. या भेटीत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील उत्तम समन्वयाबाबत
प्रधानमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.
00000
No comments:
Post a Comment