Wednesday, 19 February 2020

जय भवानी जय शिवाजी’ च्या गजराने राजधानी दुमदुमली परदेशी पाहुण्यांनाही भावला शिवजयंती सोहळा हणमंतराव गायकवाडांचा 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मान











नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम आणि मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय भवानी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियनदिल्लीचा आसमंत दुमदुमला. उत्साहाने ओतप्रोत या वातावरणाचे साक्षीदार झालेल्या 10 देशांच्या राजदुतांनाही  या सोहळयाने भुरड घातल्याचे चित्र दिसून आले. 
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. सदनाच्या सभागृहात खासदार संभाजी छत्रपती यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर संभाजी छत्रपती  यांच्या हस्ते पालखी पुजन करण्यात आले.  
   महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी  स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला खासदार संभाजी छत्रपती आणि या सोहळयाचे प्रमुख पाहुणे असणा-या पोलंड, बुल्गेरीया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, टयुनिशिया, सायप्रस आणि इस्त्रायल या 10 देशांच्या राजदुतांनी  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त शामलाल गोयल यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  
वाद्यवृंदांचे सादरीकरण ठरले आकर्षण
सनई-चौघड्याचा मधूर स्वरांनी सदनाचे वातावरण मंगलमय झाले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातारवण निणादून गेले होते.  नाशिक येथील 200 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह आणि मराठा लाईट इन्फेट्रीच्या पाईप बँड पथकाच्या खास शैलीतील सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच नऊवारीतील मुली आणि कुर्ता-पैजामातील फेटेधारी मुलांनी सादर केलेले लेझिमचे प्रात्यक्षिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला.
हणमंतराव गायकवाड यांना 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्कार
             देश-विदेशात आपल्या कार्यकतृत्वाची पताका डौलाने फडकविणारे भारत विकास समुहाचे (बिव्हीजी) प्रमुख तथा प्रसिध्द उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना  खासदार संभाजी छत्रपती यांच्या हस्ते या सोहळयात 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप  आहे. आयोजन समितीच्यावतीने यावर्षी पासूनच या पुरस्काराची सुरुवात केली आहे.
संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
तत्पूर्वी, सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. खासदार संभाजी छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित खासदार सर्वश्री अरविंद सावंत, हेमंत गोडसे, डॉ. विकास महात्मे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  
               आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                       00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.35/दि.19.02.2020


No comments:

Post a Comment