Monday, 17 February 2020

राजधानी दिल्लीत वैविद्यपूर्ण कार्यक्रमांसह 'शिवजयंती सोहळा' १० देशांचे राजदूत प्रमुख पाहुणे, हणमंतराव गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार




               
नवी दिल्ली, १७ : शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणा-या शिवजयंती सोहळयाच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे भारतातील राजदूत प्रमुख पाहुणे असणार आहेत, अशी माहिती खासदार संभाजी छत्रपती  यांनी आज दिली.
                 बीव्हीजी समुहाचे प्रमुख तथा प्रसिध्द उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना यावर्षीच्या सोहळयामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
                                     पोलंडचे राजदूत करणार हिदींतून संबोधन
                 खासदार संभाजी छत्रपती यांच्या 49, लोधी इस्टेट या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात 19 फेब्रुवारी 2020  रोजी वैविद्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असून 10 देशांचे राजदूत या सोहळयाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत स्थित पोलंड, बुल्गेरीया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, टयुनिशिया, सायप्रस आणि इस्त्रायल या दहा देशांच्या राजदूतांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास होकार दर्शविला असल्याचे त्यांनी सांगीतले. पोलंड आणि  बुल्गेरीयाचे राजदूत या सोहळयाला संबोधित करणार असून पोलंडचे राजदूत खास हिंदीतून संबोधन करतील असेही त्यांनी सांगितले. अजूनही काही राजदुतांकडून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत संमती मिळू शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.               
           हणमंतराव गायकवाड यांना 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्कार 
        शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने मागील दोन वर्षी सलग दिल्लीत शिवजयंती सोहळयाचे यशस्वी आयोजन केले आहे. यावर्षी प्रथमच या सोहळयामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. देश -विदेशात आपल्या कार्यकतृत्वाची पताका डौलाने फडकविणारे बिव्हीजी समुहाचे प्रमुख तथा प्रसिध्द उद्योजक हणमंतराव गायकवाड यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल अशी माहिती खासदार संभाजी छत्रपती यांनी दिली.
               या सोहळयात नाशिक येथील 200 वादकांचे ढोल पथक तसेच मराठा लाईट इन्फेट्रीचा पाईप बँड सहभागी होऊन आपली कला सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.                                              
                               असे असणार शिवजयंती सोहळयाचे स्वरूप  
19 फेब्रुवारी
सकाळी 9.00 ते 9.30 - पोवाडे सादरीकरण
 9 .20-  संसदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार 
अर्पण. 
 9.30 ते  9.45 :  हळदी कुंकवाचा कार्यक्रम
 9.45ते 10.00 : पाळणा पूजन 
  10. 10 :  शिवजन्माचा गुलाल
 10.10 ते 10.30 : जन्मकाळ उत्सव
  10.30 ते 10.45 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन, स्थळ-  महाराष्ट्र सदन प्रांगण
 10.45 ते 11.00 : वाद्यवृंदाचे व मर्दानी खेळांचे सादरीकरण
11.10 ते 12.30  पर्यंत  कार्यक्रम

              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                       00000 
रितेश भुयार/वि.वृ.क्र.35/दि.17.02.2020


No comments:

Post a Comment