Thursday 27 February 2020

भाषांमध्ये आदान-प्रदान गरजेचे- प्रा. शरद बाविस्कर







राजधानीत  “मराठी भाषा गौरव दिन” साजरा

नवी दिल्ली, 27 :  भाषा ही सामाजिक  वैविध्य घेऊन येत असते, त्यामुळे राज्यातील बोली भाषा  आणि अन्य राज्य व देशांतील भाषांमध्ये आदान-प्रदान व्हावे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्राध्यापक शरद बाविस्कर  यांनी  मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात केले. 
            महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्यावतीने येथील महाराष्ट्र सदनात आज मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यावेळी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा.शरद बाविस्कर, ॲड. रुचा मायी यांची व्याख्याने झाली. तर राजेश लाखे  आणि बालकलाकार पार्थ आकोटकर यांनी लोककलांचे सादरीकरण केले.
            मराठी भाषा व तिचे वैविध्य या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.शरद बाविस्कर म्हणाले, महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी भागांमध्ये वैविध्य पूर्ण बोली बोलल्या जातात. आपल्या बोली भाषेचा न्यूनगंड न बाळगता त्या-त्या भाषेतून व्यक्त होण्याची गरज आहे. बोली भाषा तसेच विविध राज्यांतील भाषा आणि इतर देशांतील भाषांचे आदान-प्रदान व्हावे, याने भाषा समृद्ध होतील असेही ते म्हणाले. प्रा.बाविस्कर यांनी आपल्या संबोधनात मराठी भाषेतील वैविध्याचा मागोवा घेतला.
            प्रसिध्द ब्लॉगर ॲड.  रूचा मायी यांनी ‘मायाजालावरील (इंटरनेट) मराठी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ब्लॉग लिखान हे आपल्यासाठी मेडिटेशन असल्याचे आणि या लिखानाने लोकांपर्यंत लवकर पोहचण्याचा आनंदच मिळतो, असे त्या म्हणाल्या. ॲड.मायी यांनी ब्लॉगवर 100 शब्दमर्यादेच्या लघुकथा स्पर्धेत सहभाग घेतला आणि देशभरातून निवड झालेल्या 5 व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला. यानंतर त्यांच्या याच पठडीतील सलग 6 लघुकथांनाही असा बहुमान मिळाला. वटसावित्री विषयावरील कथेस तीन दिवसात साडेतीन लाख व्हिव्हज मिळाल्याने ॲड. मायी यांचा उत्साह वाढला आणि आता त्या एक ब्लॉगर म्हणून प्रसिद्धीस आल्या आहेत. हा सर्व प्रवास मांडताना मराठी भाषेतच केलेले ब्लॉग वरील लिखान व लिखान  करत असताना भाषेचे ठेवावे लागणारे भान, संवादी लिखान या लिखानाचे कॉपीराईट हे विषयही त्यांनी उलगडले.
         संत तुकारामांची सुंदर वेशभूषा करून आलेल्या  पार्थ आकोटकर या चिमुकल्याने  कार्यक्रमात सादर केलेल्या  संत तुकारामांच्या शिकवणरूपी अभंगांनी उपस्थितांची मने जिंकली. दिल्लीमध्ये राहून मराठी भाषेतून सहज संवाद व उत्तम हावभाव करत पार्थने वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाचा संदेश उपस्थितांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग राजेश लाखे यांनी पोवाडा सादरीकरणातून उपस्थितांसमोर उभा केला.
            निवासी आयुक्त समीर सहाय यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी अध्यक्षीय भाषण केले, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी प्रास्तावीक केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.45/  दिनांक 27.02.2020

No comments:

Post a Comment