Wednesday 26 February 2020

‘काव्य’ हा मानवी जगण्याचा अंत:स्वर : कवयित्री अनुराधा पाटील













                            
                                                
नवी दिल्ली, 26 :  काव्य’ हे मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासातील जगण्याचा अंत:स्वर असल्याच्या भावना, आज  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिध्द  कवयित्री अनुराधा पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.   

            प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापार्श्वभूमीवर, महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांचा सत्कार व अनौपचारिक वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अनुराधा पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. अनुराधा पाटील यांचे पती तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांचेही  पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी श्रीमती पाटील म्हणाल्या, इतर गद्य लिखनापेक्षा कविता हा वांड:मय प्रकार प्राचीन व माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासातला जगण्याचा अंत:स्वर आहे. त्यामुळे कवी नसलेला माणूसही संवेदनशीलतेमुळे कविता, गाणे, अभंग या माध्यमातून व्यक्त होत असतो. मानवी भावना व्यक्त होण्यासाठी गद्यापेक्षा  पद्यच जास्त जवळचे वाटते, असेही त्या म्हणाल्या.

 माझे बालपण ग्रामीण भागात गेले. त्याकाळात जात्यावरची गाणी, पोथीवाचन, भारूड आदी मौखीक परंपरेने कानावर पडलेले शब्द यामुळेच जाणत्यावयात स्वत:ला अभिव्यक्त होण्यासाठी मी कविता या वांड:मय प्रकाराकडे वळले, असे त्या म्हणाल्या. पाठयपुस्तकातून भेटलेले कवी -लेखक  आणि पुढे लग्नानंतर मोठया प्रमाणात वाचन करायला मिळाले यातूनच काव्य लेखनाची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.   
  
   अनुराधा पाटील यांनी गेल्या 40 वर्षांतील काव्य लेखनाचा प्रवास यावेळी उलगडला. ‘दिगंत’,  ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पत्रात मांडलेला खेळ’  या काव्य संग्रहाबाबतही त्यांनी माहिती दिली. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'कदाचित अजूनही' या काव्य संग्रहातीलील कवितांमध्ये मांडण्यात आलेल्या बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण आणि गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगो-यांचे तटस्थ दर्शन यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

 उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर –कांबळे यांनी सूत्रसंचालन  तर उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार प्रदर्शन केले. 
               
                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.44/  दिनांक 26.02.2020 




No comments:

Post a Comment