नवी दिल्ली, 15 : नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रचनात्मक कार्य उभे राहू शकते, असे प्रतिपादन महात्मागांधी मिशन स्वयं अर्थ सहाय्यीत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज येथे केले.
डॉ. गव्हाणे आणि औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचे वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली यावेळी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात डॉ. गव्हाणे बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी उभय मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
डॉ. गव्हाणे म्हणाले, नवतंत्रज्ञानाने समाजात बदल घडत आहेत. याच नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश व जगात रचनात्मक कार्य उभे राहू शकते. आफ्रीकेतील एका शाळकरी मुलीने आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवाहन केल्यानंतर क्राउड फंडींगच्या माध्यमातून जगभरातून मदत मिळाली व गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला. भारतातही असे सकारात्मक बदल होत असल्याचे डॉ. गव्हाणे यांनी यावेळी सांगितले. शासन हे समाजाचे अपत्य असते त्यामुळे समाज हा नेहमीच श्रेष्ठ असतो. समाजाची ताकद ही शासनापेक्षा कैकपटीने जास्त असते.सद्या सामाजिक भान राखत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगभरातील प्रश्न सोडविण्याबाबत रचनात्मक उपक्रम जगभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आफ्रिका खंड आणि अरब देशांमधील जवळपास 80 देशांचे विद्यार्थी उच्च
शिक्षणापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना कमी खर्चात, उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी देशातील उच्च शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. भारत देशाची शैक्षणिक प्रगती या देशांच्या तुलनेत चांगली असून शैक्षणिक पर्यटनातही देश आघाडी घेवू शकतो त्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद येथे स्थित महात्मागांधी मिशन स्वयं अर्थ सहाय्यीत विद्यापीठाच्यावतीने यावर्षीपासून मोफत अभियांत्रिकी शिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत जात, धर्म, भौगोलीक असमानता हे विषय वगळून केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता प्रमाण मानून 50 विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाच्या वैविद्यपूर्ण कार्याची व उपक्रमांची माहितीही डॉ. गव्हाणे यांनी दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्य इतरांसाठी अनुकरणीय
शासनाचे काम जनतेपर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राने केलेले जनसंपर्काचे बहुभाषी काम कौतुकास्पद असून हे कार्य इतरांसाठी अनुकरणीय ठरेल असे गौरवोद्गाार डॉ. गव्हाणे यांनी काढले. परिचय केंद्राद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि कार्य प्रेरणादायी असून ‘ई-बुक’ च्या माध्यमातून या कामाचे सकंलन व्हावे अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
औरंगाबाद
आकाशवाणी वृत्त
विभाग ठरला राज्यातील
पहिला पेपरलेस : रमेश
जायभाये
देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वृत्त विभागात
2013 मध्ये फ्रांसचे सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यात आले. हे स्वॉफ्टवेर इंस्टॉल करून औरंगाबाद आकाशवाणी केंद्राने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून राज्यातील आकाशवाणी केंद्रामध्ये पहिला पेपरलेस वृत्त विभाग होण्याचा मान मिळवला असल्याचे यावेळी केंद्र प्रमुख रमेश जायभाये यांनी आपल्या संबोधनात सांगितले. वृत्तविभागातील बातम्या संगणकावर टंकलिखीत होतात व टेली प्रॉम्टरहून त्या वाचल्या जातात. यामुळे कागद, शाहीचा खर्च वाचला व अचूक काम होऊ लागले आहे. या बातम्या युटयूब चॅनलवर स्ट्रीमींगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असून आता या युटयूबचॅनलला जाहीराती मिळतात व त्यातून महसूल गोळा होतो असेही श्री. जायभाये यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपसंचालक दयानंद कांबळे यांनी केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार मानले.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.34/दि.15.02.2020
No comments:
Post a Comment