Saturday, 26 September 2020

महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

नवी दिल्ली, 26 : वैज्ञानिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्रातील चार शास्त्रज्ञांना केंद्र शासनाचा मानाचा ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’ साठी एकूण सात श्रेणींमध्ये 14 वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे येथील प्रत्येकी दोन अशा एकूण चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिपदेच्यावतीने (सीएसआयआर) संस्थेच्या एसएस भटनागर सभागृहात आज 79 व्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान,भूविज्ञान मंत्री तथा सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक तथा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ शेखर मांडे यांनी वर्ष 2020 च्या ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ विजेत्या वैज्ञानिकांच्या नावाची घोषणा केली. एकूण सात श्रेणींमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण 14 वैज्ञानिकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 5 लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमध्ये दोन्ही पुरस्कार महाराष्ट्राला अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमधील दोन्ही पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिकांनी आपली नाममुद्रा उमटविली आहे. सीएसआयर प्रणीत पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ अमोल कुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ किंशुक दासगुप्ता हे या श्रेणीत विजेते ठरले असून त्यांना शांती स्वरूप भटनागर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आयआयटी मुंबईच्या दोन वैज्ञानिकांना पुरस्कार आपल्या कार्यकतृत्चाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविणा-या मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दोन वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळया श्रेणींमध्ये हा पुरस्कार पटकाविला आहे. संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सुर्येंदू दत्ता यांना पृथ्वी, वातावरण, समुद्री व ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये तर गणित विभागाचे शास्त्रज्ञ डॉ यु के आनंदवर्धन यांना गणिती विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. एचआरडीजी आणि सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळांचे प्रमुख ए चक्रवर्ती तसेच अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित होते. आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic 00000 रितेश भुयार/वि.वृ.क्र.87 /दि.26.09.2020

Friday, 25 September 2020

राजधानीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic 000000 रितेश भुयार /वृत विशेष क्र.86 / दि.25.09.2020

Tuesday, 22 September 2020

खेलो इंडिया अंतर्गत बालेवाडीतील क्रिडा संकुलाची निवड

नवी दिल्ली, 22 : उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत राज्यामधील पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलाचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने घेतला. महाराष्ट्रासह देशातील अन्य पाच क्रिडा संकुलांचेही अद्यावतीकरण केले जाईल. क्रिडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत दुस-या टप्प्यातील खेलो इंडिया स्टेट् सेंटर ऑफ एक्सलेंस(केआयएससीई) मध्ये देशातील 6 राज्यातील क्रिडा संकुलांचे अद्यावतीकरणाचा निर्णय आज घेतला. यामध्ये महाराष्ट्रासह मेघालय, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दिव, मध्यप्रदेश, असम, सिक्कम या राज्यांचा आणि केंद्र शासीत प्रेदशांचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरूवातीस मंत्रालयाने कर्नाटक, ओडिशा, केरळ, तेलंगणा, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड या आठ राज्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (केआयएससीई) येथील क्रिडा संकुलांची निवड अद्यावतीकरणासाठी केली होती. केआयएससीईच्या नवीनीकरणाबाबत सांगताना श्री रिजिजू म्हणाले, खेळाडूंना जागतीक दर्जाच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने एक सशक्त पाऊल आहे. यामुळे येत्या काळात खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांमध्ये चमक दाखवू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवड करण्यात आलेल्या क्रिडा संकुलांमध्ये सध्या असलेल्या सोयी-सुविधा आणि भविष्यात करावयाचे बदल हे लक्षात घेऊन निवड करण्यात आलेली आहे. भारत सरकार या केंद्राना विशेष निधी उपलब्ध करून देईल. त्याव्दारे नवीन उपकरणे, तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकांची नेमणुक केली जाईल.

Thursday, 17 September 2020

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

महाराष्ट्राला एकूण 8 पुरस्कार नवी दिल्ली, 17 : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला. विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुस-या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन दूरदृश्य प्रणालीच्याव्दारे करण्यात आले. एआयसीटीई अंतर्गत असणा-या देशातील विविध संस्थांना 14 श्रेणींमध्ये 34 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांना विशिष्ट क्षेत्रात त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करणे, मान्यता देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यामुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. यावेळी पोखरियाल म्हणाले, भारतात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता महामारीपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे महत्वपुर्ण आव्हान सध्या देशासमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक संस्था संशोधनाव्दारे मदत करीत आहेत. त्यामुळेच विश्वकर्मा पुरस्कार 2020 या वर्षाची संकल्पना ‘इंडिया फाइट्स’ कोरोना अशी ठेवली आहे. संपूर्ण 14 श्रेणींतील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेला सन्मानीत करण्यात आले. यासह या महाविद्यालयाला दुस-या श्रेणीतील दुसरा पुरस्कारही प्राप्त झाला. दुस-या श्रेणीतील तिसरा पुरस्कार पुण्यातीलच डॉ. डी.वाय.पाटील, औषध विज्ञान आणि संशोधन संस्थेला प्रदान करण्यात आला. सहाव्या श्रेणीतील दुसरा पुरस्कार औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी विद्यालयाला प्रदान करण्यात आला. नवव्या आणि अकराव्या श्रेणीतील क्रमश: दुसरा आणि तिसरा पुरस्कार पुण्यातील विश्वकर्मा तांत्रिक संस्थेने पटकावला आहे. असे एकूण 8 पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहे. विविध 14 श्रेणींसाठी 33 संस्थांची निवड करण्यात आली. यासाठी 900 हून अधिक संस्थांची नोंदणी झाली होती. या श्रेणीमध्ये आसपासच्या परिसरातील आयोजित जनजागृती कार्यक्रम, समुपदेशन / टेली समर्थन प्रदान, सामुग्री / उत्पादन - उत्पादित / विकसित (उदा. मास्क , सॅनिटायझर, व्हेंटिलेटर इ.), साहित्य / उत्पादन वितरीत (उदा. मास्क , सॅनिटायझर, साबण, अन्न, कपडे, औषध, अभ्यास साहित्य इ.), सार्वजनिक मालमत्ता देखभाल (इमारत / उपकरणे), लॉकडाउन कालावधी दरम्यान तुमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी किती नाविन्यपणे तुम्ही वर्ग घेणे , जवळच्या महाविद्यालयीन / शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टीचिंग लर्निंग कार्यक्रमाचे आयोजन, कोविड -19 चा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या संस्थात्मक पायाभूत सुविधा, प्रदान केलेल्या अन्य मदतीचा तपशील (दौरा, सेवा, स्थलांतरितांना मदत इ.), मदत निधीसाठी तुमची संस्था / प्राध्यापक / विद्यार्थ्यांनी दिलेले आर्थिक योगदान, कोविड -19 च्या प्रसार आणि प्रतिबंधाविरूद्ध प्रकल्प / योजना / उपक्रम राबविण्यात अधिकाऱ्यांना मदत करणे, कोविड --19 च्या विरूद्ध इतर कोणतेही योगदान, कोविड --19 नंतर पुनर्विकास / पुनर्वसन योजना या श्रेणींचा समावेश होता.

Friday, 11 September 2020

स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’



 

                           

नवी दिल्ली, 11  :  केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स )देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय राज्याला स्टार्टअप सुधारणांच्या  श्रेणींमध्ये अन्य तीन स्थान मिळाली आहेत.

          

        केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीवर आधारीत निकालाची घोषणा (वर्ष 2019) व सत्कार समारंभ आज येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणीज्य व  उद्योग मंत्री  पियुष गोयल, राज्यमंत्री ओम प्रकाश  आणि सचिव गुरु प्रसाद मोहपात्रा उपस्थित होते. केंद्रीय वाणीज्य व  उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी हे ही दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्व सहभागी राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  उपस्थित होते.

 

                 राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठी ठरविण्यात आलेल्या विविध निकषांच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या निकालात एकूण पाच श्रेणींमध्ये 22 राज्ये आणि तीन केंद्र शासीत प्रदेशांना क्रमवारी देण्यात आली. यात महाराष्ट्राला स्टार्टअप योजनेच्या नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये दुस-या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते, त्यांनी हा सन्मान स्वीकारला.

 

         राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी व  उद्दिष्टय ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. नाविण्यपूर्ण दृष्टीकोण व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात नावीन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी  राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. याची विशेष दखल या निकालात घेण्यात आली. गेल्या चार वर्षात राज्यामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून 500 कोटींचा निधी उभारण्यात आला.स्टार्टअपसाठी पूरक वातावरण निर्मिती करत सींगल पॉईंट काँटॅक्ट उभारण्यात आले.

         यासोबतच स्टार्टअप सुधारणांमध्ये महाराष्ट्राने नवीन उद्योजक तयार करणे, नाविन्यपूर्ण विस्तार करणे तसेच जनजागृती आणि प्रसार या तीन वेग-वेगळया निकषांवरही या निकालात उत्तम गुण अर्जित करून बाजी मारली आहे.

 

   आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार /वि.वृ.क्र.82 /दि.11.09.2020

 

Monday, 7 September 2020

राजधानीत आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी

 








              


नवी दिल्ली, 7 : आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात  साजरी करण्यात आली.

 कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्यसचिव श्यामलाल गोयल यांनी  राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  

    महाराष्ट्र परिचय केंद्रात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन 

 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                            

                                                   ०००००   

 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.८२/ दिनांक ७.०९.२०२०                                              

 

 

 

महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 

                



  नवी दिल्ली, 5  : अहमदनगर जिल्हयातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक  पुरस्काराने गौरविण्यात आले.

         केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर शास्त्रीभवन स्थित शिक्षण मंत्रालयातून केंद्रीय शिक्षण मंत्री  डॉ रमेश पोखरीयाल निशंक आणि शिक्षक राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते.

देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी 47 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणीमध्ये  गौरविण्यात आले  महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

अहमदनगर जिल्हयाच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी (चेडगांव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलाराम यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत श्री. मंगलाराम हे नवनवीन पध्दतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी ई-लर्निंग पध्दतीचा अवलंब केला असून शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल केला आहे. श्री. मंगलाराम यांनी सुरु केलेल्या व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थी हे परदेशातील शिक्षकतज्ज्ञांशी संवाद साधतात. ‘स्काइप इन क्लासरूम या उपक्रमाद्वारे या शाळेतील विद्यार्थ्यांनी 25 देशांतील 200 पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक देवाण-घेवाण केली आहे. त्यांनी दक्षिण कोरिया मधल्या शाळेबरोबर कल्चरल बॉक्स हा सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा उपक्रम राबविला आहे.

विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन तसेच शालेय स्तरावरील बालआनंद मेळावा’, बालसृष्टी उपक्रम’, डॉ अब्दुल कलाम तरंग वाचनालय आदी  त्यांचे उल्लेखनीय उपक्रम आहेत. स्थानिक ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्वपटवून देत त्यांनी जागरूकता घडवली व या कार्यात त्यांचेही सहकार्य मिळविले आहे.

मुंबई येथील अणुशक्तीनगर भागातील भाभा अणुशक्ती केंद्रीय शाळा क्रमांक 4 च्या शिक्षिका संगीता सोहनी यांना उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले.  हसत खेळत विज्ञान शिकवण्याची कला त्यांनी विकसीत केली आहे. आयसीटी  शिक्षण पध्दतीचा प्रभावी उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सोपे केले. काचेच्या बांगडयांद्वारे केमीकल बाँडींग आणि फुग्यांचा उपयोग करून रसायण शास्त्रातील बारीकसारीक घटक शिकवण्याच्या त्यांच्या कलेचे विशेष कौतुक झाले. विद्यार्थ्यांना अध्ययन अधिक सुगम होण्यासाठी त्या आपल्या सहकारी शिक्षक शिक्षिकांनाही प्रशिक्षण देतात.                                  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार/वि.वृ.क्र.81 /दि.05.09.2020