नवी दिल्ली दि. 14 : जनसंपर्क आणि समाजमाध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांना आज ‘सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
येथील इंडिया हॅबीटॅट सेंटरमध्ये पुणे स्थित सुर्यदत्ता शैक्षणिक संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना ‘सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार-2020’ ने गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडीया आणि ज्येष्ट नेते शाम जाजु यांच्या हस्ते यावेळी एक आंतरराष्ट्रीय आणि पाच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले .
जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्री कांबळे यांचा सन्मान
दयानंद कांबळे यांनी गेल्या 25 वर्षांपासून माध्यम व जनसंपर्क क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे .श्री. कांबळे हे गेल्या सात वर्षांपासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाचे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.
दिल्ली स्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माहिती कार्यालयांच्या संघटनेचे (सिप्रा)अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील शासकीय जनसंपर्क कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे. कार्यालयाच्या मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ट्विटर हँडल, फेसबुक, युटयूब, ब्लॉग आदी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून त्यांनी शासनातील जनसंपर्काचे उत्तम कार्य केले आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र परिचय केंद्राला केंद्रीय मंत्री , राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, कला, साहित्य, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी भेटी दिल्या आहेत.
त्याआधी त्यांनी दैनिक लोकमत आणि दैनिक एकमत या वृत्तपत्रांमध्ये कार्य केले आहे. तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्यही केले आहे.
या कार्यक्रमात आचार्य डॉ. लोकेश मुनी यांना सामाजिक व अध्यात्मिक
क्षेत्रातील योगदानासाठी ‘आंतरराष्ट्रीय सुर्य गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार तथा इंडिया टुडे वृत्तपत्राचे
माजी वरिष्ठ संपादक एस. व्यंकट नारायण आणि आय टिव्ही चे मुख्य राजकीय संपादक मनिष अवस्थी यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी
सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील
उल्लेखनीय योगदानासाठी संस्कृती विद्यापीठाच्या संचालक डॉ. दिव्या तंवर आणि द ग्लोबल टेक्नॉलॉजी नेटवर्कचे विजय मिश्रा
यांना सन्मानित करण्यात आले.
000000
No comments:
Post a Comment