नवी दिल्ली, दि. २३ : ‘जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’ या न्यायाप्रमाणे मराठी विश्वकोश हा माहितीचा खजिना आहे. हा खजिना डिजीटल माध्यमातून जगभर पोहचल्याचे मत प्रसिध्द लेखिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ‘ध्यानी मनी विश्वकोश’ या विषयावर डॉ. वाड बोलत होत्या.
मराठी विश्वकोश ही माझ्या आयुष्यातील आनंददायी गोष्ट असून या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करता आल्याचे सांगत त्यांनी ५३ वर्ष रखडलेल्या विश्वकोशाचे उर्वरीत खंड पूर्ण करण्याच्या निर्मिती प्रक्रीयेचा पट यावेळी उलगडला. मुख्याध्यापिका पदाहून निवृत्त झाल्यानंतर मुंबईतील पोतादार शिक्षण संस्थेत विश्वस्तपदावर असताना डिसेंबर २००५ विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
यानंतर विश्वकोशाचा १७ वा खंड तयार करण्यासाठी केलेला सातारा जिल्हयातील वाई येथील मुक्काम . कामाला सुरुवात केली तेव्हा नोंदी तयार होत्या पण त्या ७ वर्ष जुन्या झाल्या होत्या. त्यातील प्रत्येक नोंदीचे परिशीलन करून पावने दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून ८८३ नोंदी पूर्ण करून सतारावा खंड पूर्ण होऊन त्याचे प्रकाशनही झाल्याचे त्यांनी सांगितले.
पावने
दोन वर्षात १८ वा खंड पूर्ण केला. १९ वा खंड ही झाला या दोन्ही खंडांचे प्रकाशन
झाले.
विश्वकोशाच्या २० खंड परिपूर्तीचा खंड होता. मंडळाच्या सदस्यांशी मसलत करून १२०० पानाचा खंड न काढता पूर्वाध व उत्तरार्ध असे खंड काढण्याचे ठरले. पूर्वाध झाला आता फक्त ४०० नोंदी शिल्लक असताना विश्वकोश मंडळ बरखास्त झाले. अशात राज्य सरकारने उर्वरीत नोंदी पूर्ण करण्याची जबाबदारी दिली व ४ महिने वाईला तळ ठोकून हा खंड पूर्ण केले. अखेर २४ जून २०१५ ला मराठी विश्वकोशाचे अंतिम प्रकाशन झाल्याचे डॉ. वाड म्हणाल्या.
विश्वकोशाच्या संगणीकरणाची वाटचाल
२०११ मध्ये विश्वकोश संगणकीकरणाची घोषणा केली. सीडॅक या पुण्याच्या संस्थेत ११ महिन्यात टाईपींगचे कार्य पूर्ण झाले आणि विश्वकोश डिजीटल झाला. तत्पूर्वी ८ मार्च २००७ ला मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळ तयार केले. नंतर सबंध विश्वकोश ६ सिडी संच स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. वाड यांनी सांगितले. विश्वकोशा विषयी जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील १८० ठिकाणी वाचन स्पर्धांचे आयोजन व त्यातील अनुभवही त्यांनी कथन केले.
२० व्या खंडाच्या विज्ञान विभागाच्या ८ दीर्घ नोंदी पूर्ण करण्यात प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकार यांच्या मदतीने ४ महिन्यात पूर्ण झालेल्या नोंदी तसेच ‘कुमारकोश’ तयार करताना जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सूचनेतून तयार झालेल्या दोन रंगीत पानांच्या पर्यावरण खंडाची रोचक माहितीही त्यांनी यावेळी दिली. ‘मराठीच्या वैभवाचा मानकरी विश्वकोश’ हे विश्वकोशाचे गीत २०११ मध्ये तयार झाले. प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायले तर प्रसिध्द संगीतकार अशोक पत्की यांनी या गितास संगीत दिले आणि प्रसिध्द अभिनेते सुबोध भावे यांनी ते अभिनीत केल्याचे त्यांनी सांगितले.
डिजीटल विश्वकोशाच्या कामगिरीसही कौतुकाची थाप मिळाली या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मंथनचे आशियाई मानांकन मिळाले. विश्वकोशाच्या डिजीटल स्वरूपामुळे १५ लाख वाचक आणि १०५ देशात विश्वकोश वाचला गेला हा समाधनाचा भावही डॉ वाड यांनी व्यक्त केला.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
००००
िरितेश भुयार /वृत्त वि. क्र.५९ /दिनांक २३.०३.२०२१
No comments:
Post a Comment