Tuesday, 30 March 2021

छत्रपती शाहू आणि डॉ आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना मोठे बळ - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत


 नवी दिल्ली , २९ : छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  छत्रपती शाहूंचे‍ विचार पुढे घेवून जाण्याचे केलेले कार्य आणि या दोघांमधील ऋणानुबंधातून आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना मोठे बळ मिळाले, असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत योनी आज मांडले.

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प गुंफताना छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध या विषयावर श्री सावंत बोलत होते.

      छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तीमत्वांनी भारतदेश आणि महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रावर दुरगामी परिणाम केला. या दोन्ही महापुरुषांमध्ये अडीच वर्षांच्या काळात झालेल्या अप्रकाशित पत्रव्यवहारातून त्यांच्या नात्यातील ऋणानुबंध आपणास दिसून येतो. या कालावधीतील गाठी-भेटी व परिषदांमधून शाहूंनी आंबेडकरांचे नेतृत्व प्रस्थापित केले.त्यामुळे बाबासाहेबांना नैतृत्वाचा संघर्ष कमी होवून त्यांना राजमार्ग मिळाला ,असे श्री सांवत म्हणाले.

डॉ आंबेडकरांनी स्वत:च्या हस्ताक्षरात छत्रपती शाहुंना लिहीलेली काही अप्रकाशित पत्र कोल्हापूरच्या पुराभिलेख विभागात सापडली आहेत. नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेच्या संबंधाने ही पत्र होती. शाहु आणि आंबेडकर एकाच ध्येयाने पुढे जाणारे व्यक्तीमत्व होती. कागदपत्र आणि अभ्यास असा सांगतो की फक्त दोन ते अडी वर्षाच्या त्यांच्या एकमेकांच्या गाठी-भेटी आहेत. छत्रपती शाहुंनी १९०२ ला त्यांच्या कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढून  ५० टक्के जागा आरक्षीत ठेवल्या होत्या. बाबासाहेबांची भेट होण्याआधी शाहु महाराजांनी ६ सप्टेंबर १९१९ रोजी शिवतरकर मास्तरांना लिहीलेले पत्र उपलब्ध झाले आहे. या पत्रानंतरच छत्रपती शाहु आणि बाबासाहेब यांची भेट झाली. या पत्रात शाहुंनी अस्पृष्यतेविरोधातील आपले मत लिहीली होती. या पत्राचे प्रतिबिंब राज्यघटनेत आल्याचे ‍ दिसते असे श्री सावंत म्हणाले.

     अस्पृष्य चळवळीच्या नेतृत्चाच्या शोधात असताना छत्रपती शाहुना डॉ. आंबेडकरांविषयी कळताच ते परळच्या चाळीत स्वत: गेले. या दोघा महापुरुषांमध्ये १९१९ ला पहिली भेट झाली. त्या भेटीतच मूकनायकृत्तपत्रासाठी शाहूंनी अडीच हजार रूपये दिले. पहिल्याच भेटीत शाहूंनी आंबेडकरांना कोल्हापूर संस्थानात आमंत्रित केले त्यांचे स्वागत करत फेटा दिला. बाबासाहेबांनीही शाहूंनी बांधलेल्या या फेटयाचा मी आयुष्यभर मान राखीन असा शब्द  दिला. आणि येथून या दोन नेत्यांतील ऋणानुबंधाला सुरुवात झाली. गाठी भेटी सुरु झाल्या .

                         भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार छत्रपती शाहुंनी भारताला दिला

            कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीच्या मानगाव येथे २० आणि २१ मार्च १९२० ला दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन भरले हे अधिवेशन म्हणजे बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनातील नैतृत्वाची सुरुवात होती. बाबासाहेब अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात पारित झालेल्या १५ ठरावांवरच बाबासाहेबांच्या पुढील चळवळीची वाटचाल झाली. या अधिवेशनातच छत्रपती शाहूंनी डॉ आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याची घोषणा केली. पुढे ते संपूर्ण भारताचे नेते झाले. भारताच्या क्षितीजावर तडपणा-या या ता-याने देशाला राज्यघटना दिली ज्यावर आज आपला देश समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे असे श्री सावंत म्हणाले.

                                    बाबासाहेबांना शाहुंविषयी होता अतिव आदर

            बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत वर्तमानपत्रात शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांक काढला व त्याची  माहिती गोळा करण्यासाठी आपण स्वत: कोल्हापूरला येत असल्याचे  पत्र त्यांनी शाहूंना लिहीले होते. १९५६ मध्ये प्रबुध्द भारत च्या अंकात बाबासाहेबांनी शाहूंची महती सांगणारा अंक प्रकाशित केला. शाहुंच्या निधनानंतरही बाबासाहेबांच्या मनातून शाहू कधीच गेले नाहीत, छत्रपती शाहूंचा जन्मदिन उत्सव म्हणून साजरा व्हावा अशी  कल्पना बाबासाहेबांनी मांडली होती, असे श्री सावंत म्हणाले.

            ३०, ३१ मे १९२० दरम्यान नागपूर मध्ये अखिल भारतीय परिषद भरणार होती शाहू महाराजांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी बाबासाहेंबांची इच्छा होती. त्याचवेळी छत्रपती शाहुंच्या कन्या अक्कासाहेब यांची प्रकृती बरी नव्हती. अक्कासाहेब आजारी असल्याने येवू शकत नाही असे शाहुंनी बाबासाहेबांना पत्राद्वारे कळवले होते. त्यावर बाबासाहेबांनी शाहुंना चार पानाचे पत्र लिहीले त्यात त्यांनी अक्कासाहेबांप्रमाणेच आम्ही आपले लेकर नाही का? असा लडीवाळ हक्क सांगितला होता. या पत्रानंतर शाहुंनी विनंती मान्य करून नागपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविल्याचे श्री सावंत म्हणाले.उच्च शिक्षणासाठी डॉ.आंबेडकर लंडनला  गेले तेव्हाही  छत्रपती शाहुंचा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरु होता.

महात्मा फुले यांचा वारसा छत्रपती शाहुंनी पुढे नेला तर  डॉ. आंबेडकरांनी  फुले-शाहुंच्या विचारांचा वारसा पुढे नेत त्यात भर टाकली. भारत देशाचा सबंध गाडा ज्या राज्यघटनेवर चालतो ती राज्यघटना डॉ. आंबेडकरांनी आपल्याला दिली.आधुनिक महाराष्ट्राचा पायाच या महारुषांनी घातला व हेच विचार महाराष्ट्राला पुढे घेवून जाणारे आहेत असा विश्वास श्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

        http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००

रितेशभुयार /वृत्त.वि. क्र.६९/दिनांक २९.०३.२०२ 

 


No comments:

Post a Comment