नवी दिल्ली , २ : ‘विश्वबंधुत्वाची शिकवण’ देणा-या संत ज्ञानेश्वरांपासून ‘सब भूमि गोपाल की’ हा संदेश देणा-या विनोबा भावे अशा नररत्नांची खान असणारे महाराष्ट्र हे सहिष्णु राज्य आहे व राज्यात भारतदेशाच्या एकात्मतेचे दर्शन घडते असे मत, प्रसिध्द कवी , लेखक अशोक नायगावकर यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे पंधरावे
पुष्प गुंफताना “मी
अनुभवलेले महाराष्ट्राचे परिवर्तन” या विषयावर श्री नायगावकर बोलत होते.
कवी संमेलने व अन्य साहित्यिक कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देश-विदेशात भ्रमण केल्यानंतर आलेले अनुभव व निरिक्षणातून श्री. नायगावर यांनी महाराष्ट्रातील परिवर्तनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, महाराष्ट्राला थोर नररत्नांची पंरपरा लाभली आहे त्यांच्या शिकवणीमुळे येथील लोकांच्या जगण्यामध्ये सहिष्णुता आली आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे ‘आता विश्वात्मके देवे..’अशी हाक घातली तर पुढे विनोबांच्या ‘सब भूमि गोपाल की’ या हाकेतूनही महाराष्ट्राच्या सहिष्णुतेची प्रचिती आली. राष्ट्रीय एकात्मता हा महाराष्ट्राचा मुख्य कणा आहे. राज्यात ओनम, पोंगल, छटपुजा, बैसाखी, गरबा, दुर्गापुजा आदी सर्व सण उत्साहात साजरे होतात. त्यामुळे देशातील एकत्रित चित्रच महाराष्ट्रात बघायला मिळते असे श्री नायगावकर यांनी सांगितले.
राज्यात उत्तम शिक्षण संस्थांचे जाळे
राज्यात मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्याने
गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहचले व माझ्या सारख्या असंख्य लोकांनी शाळेपासून
ते उच्च शिक्षणापर्यंत प्रवास पूर्ण करून वेगवेगळया क्षेत्रात आपले योगदान
दिल्याचे श्री नायगावकर म्हणाले. सुरुवातीच्या
काळात महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्या शिक्षण संस्था होत्या. मात्र,
पुढे हे चित्र बदलले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापलेली ‘रयत
शिक्षण संस्था’, बापुसाहेब साळुंखे यांनी स्थापन केलेली
‘विवेकानंद शिक्षण संस्था’,
विदर्भात पंजाबराव देशमुख यांनी स्थापलेली ‘शिवाजी
शिक्षण संस्था’ नाशिक भागातील ‘मराठा
विद्या प्रसारक मंडळ’ आदी संस्थांच्या माध्यमातून राज्यात महाविद्यालये
रूपी शिक्षणाची संकुले उभी राहिली आहेत, असे
श्री नायगावकर म्हणाले.
जगभर मराठीची ध्वजा डौलाने फडकत आहे
१९५०
पर्यंत विशिष्ट समाज घटकातील मराठी लोकच परदेशात जात.
मात्र, १९६० च्या दशकात हे चित्र बदलले आणि तळागाळतले,
समाजाच्या विविध घटकातले मराठी माणसं जगभर जावू लागली. कविता वाचनाच्या निमित्ताने अमेरिकेतील
सर्वच राज्यांमध्ये तेथील बृह्नमहाराष्ट्र मंडळांमध्ये, इंग्लड मधील महाराष्ट्र मंडळांमध्ये,
दक्षिण आशियाई देशांमध्येही जाणे झाले. या सर्व
ठिकाणी मराठी माणसांनी वेगे-वेगळया
क्षेत्रातात आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याचे दिसले, जगात सर्वत्र मराठी माणसं
पाहून उर अभिमानाने भरून येतो, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण लोकजीवनामध्ये महाराष्ट्र
सर्वदूर पसरलेल्या ग्रामीण भागाच्या लोकजीवनात
महाराष्ट्राचे प्रतिबिंब दिसते. शिवबा,तुकोबांचा
जागर येथे दिसतो. आता राज्यातील ग्रामीणभागही
विकासाच्यादिशेने अग्रेसर झाल्याचे चित्र आहे. सांगली
जिल्हयातील इस्लामपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी तेथील होजीयरी कारखान्यात शिवन
काम करणा-या तळागाळातील ५०० महिला व त्यांच्या होजीयरी वस्तूंचा इटाली व रोममध्ये
केली जाणारी निर्यात पाहून थक्क झालो असे त्यांनी सांगितले . मिरजजवळ
कवठेमहांकाळ परिसरातील हिंगणगाव या छोटयाशा गावात श्री. लोंडे
यांनी सुरु केलेले उद्योगाचे छोटे युनीट व यात कार्यरत २०० महिलांनी तयार केलेल्या
कापडाच्या वैविद्यपूर्ण वस्तुंची जपान प्रमाणेच अन्य पाश्चात्य देशात निर्यात होत
असल्याचे चित्रही आश्वासक असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या
विविध भागांतून परदेशात होत असलेली शेतमालाची निर्यातही राज्यातील परिवर्तनाची
साक्ष देते.
१९५७- ५८ मध्ये राज्याच्या ग्रामीण
भागात कारखाने किंवा कृषी उद्योग नव्हते. सहकार
क्षेत्राने राज्याच्या उद्योग क्षेत्राला दिलेली चालना व पुढे राज्याच्या विविध
भागात फुललेल्या कारखानदारीनेही राज्याला वेगळी ओळख दिली. राज्यात
जायकवाडी, उजनी, धोम, बलकवडी अशी एकानेक धरण निर्माण झाली व मोठया प्रमाणात जमीन
ओलीताखाली आली. आधी गावांमध्ये दवाखाने इस्पीतळे
नव्हती आता राज्यातील हे चित्र बदलेले दिसते. आता
राज्यातील छोटया गावातही निश्नात डॉक्टर उपलब्ध असल्याचे चित्र आहे. मराठी
उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांनी १ लाखांहून अधिक लोकांना दिलेला रोजगार व देशात
उंचावलेली महाराष्ट्राची मान याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
महाराष्ट्रात
राष्ट्रीय एकात्मतेचे चित्र दिसून येते विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महारष्ट्राची
ध्वजा उंचउंच जावो अशा भावना व्यक्त करत श्री नायगावकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना उद् धृत करणा-या “जिथे सूर्य
सर्वांच्या आधी उठतो त्या ईशान्येला माझी नजर पोहचते, बांग्लादेशला
वळसा घालून थांबते…” ही कविता सादर करून व्याख्यानाचा
समारोप केला.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर
हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
०००००
रितेशभुयार /वृत्त.वि. क्र.८०/ दिनांक २.०४.२०२१
No comments:
Post a Comment