नवी
दिल्ली, १ एप्रिल : शासकीय
धोरण राज्यातील लाभार्थी जनतेला अनुकुल व्हावीत यासाठी शासनासोबत उत्तम संवाद ठेवत
राज्याच्या विकासाला गती देण्याचे महत्वाचे कार्य स्वयंसेवी संस्थांनी केले असून यात
महाराष्ट्र देशात अग्रणी असल्याचे मत, सामाजिक कार्यकर्त्या मेधा कुळकर्णी यांनी
आज मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव
व्याख्यानमालेचे चौदावे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राच्या विकासात
स्वयंसेवी संस्थांचे योगदान’ या विषयावर मेधा कुळकर्णी बोलत होत्या.
शासनाच्या
विकासकार्याची अंमलबजावणी करू शकणारी एक विश्वासू यंत्रणा या भूमिकेतून स्वयंसेवी
संस्थांची मदत घ्यायला सुरुवात झाली. यातूनच स्वयंसेवी संस्थांचा विस्तार व विकास
व्हायला सुरुवात झाली. शासकीय धोरण गोरगरिबांना अनुकुल व्हावीत यासाठी सरकार सोबत उत्तम संवाद ठेवण्याचे काम स्वयंसेवी संस्थांनी केले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात हे
काम जोरकसपणे झाल्याने महाराष्ट्र हे आज अग्रणी राज्य असल्याचे श्रीमती कुळकर्णी
म्हणाल्या.
पीडित,
वंचित, शोषित लोकसमुहांच्या परिस्थितीत गुणात्मक बदल घडवून आणणे ही स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची प्रेरणा असते. महाराष्ट्राला
या व्यापक प्रेरणेचा वारसा लाभला असल्याचे सांगून महात्मा फुले यांनी स्थापन
केलेला ‘सत्यशोधक समाज’ ही महाराष्ट्रातील आद्य
समाजसेवी संस्था ठरू शकते असे त्यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून महात्मा
फुले यांनी प्रस्थापीत रुढी परंपरांच्या पलीकडे जात सत्यशोधन करत नव्या संस्कृतीचा
पर्यायच समाजापुढे उपलब्ध करून दिला. त्यानंतर जाती व्यवस्थेवर घावघालून नवी
व्यवस्था निर्माण करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर, १९०५ मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी
जातीधर्मापलीकडे जावून देशप्रगती व समाजविकास ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी’ची स्थापना केली.
महाराष्ट्रात
शेतीपासून शहर वाहतुकीपर्यंत , हवामान बदलापासून मराठी भाषेच्या वापरा पर्यंत आणि
पाण्यापासून पत्रकारितेपर्यंत असे अनेकविध विषय घेवून काम करणा-या स्वयंसेवी
संस्था आहेत. आदिवासी , दलित,भटके- विमुक्त, शेतमजूर, महिला,
वैश्या, देवदासी, परित्यक्ता, बालकामगार, अपंग, असंघटीत कामगार अशा
लोकसमुहाचे प्रश्न घेवून या संस्था काम करतात.जमीन, पाणी, आरोग्य, वीज, शिक्षण,
शेती, तंत्रज्ञान, माध्यमे, समाज माध्यमे आणि पर्यावरण हे विषय घेवूनही अनेक
स्वयंसेवी संस्था काम करीत असून ही सगळी
काम अराजकीय व निरुपद्रवी आहेत असे श्रीमती कुळकर्णी यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे
महत्वपूर्ण कार्य
महाराष्ट्रात प्रांरभापासून संत
ज्ञानेश्वरांपासून संतांची प्रभावळ ही आध्यात्मिक परंपरा व छत्रपती शिवाजी
महाराजांची राजकीय परंपरा या दोन्ही व्यापक विचारातून समता आणि धर्मनिरपेक्षता ही
मुल्ये महाराष्ट्रात रुळली.
ताराबाई मोडक यांचा कोसबाडचा ‘बालवाडी, अंगणवाडी, विकासवाडी प्रवास’, मनीबाई देसाई यांनी
शेती आणि शेती उत्पादनांना केंद्रस्थानी ठेवत सुरु केलेली ‘बायफ’ ही संस्था. बाबा आढावांची ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ, ‘हमाल पंचायत’, ‘भंगार आणि कचरा वेचणा-यांची संघटना’ ही महत्वपूर्ण ठरते.
विलासराव साळुंखे यांची ‘पाणी पंचायत’. हमीद दलवाईंनी स्थापन केलेला ‘मुस्लीम सत्यशोधक समाज’ हे त्या -त्या काळातील सामाजिक क्षेत्रातील
अभिनव आविष्कार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांसाठी
कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
प्रकल्प
ग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत चळवळ व कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले
राज्य आहे १९७६ मध्ये राज्यात याबाबत कायदा झाला. सेनापती बापट तर प्रकल्पग्रस्तांच्या लढाईचे आद्य सेनापती होत.
कॉम्रेड नाना शेटे ,शांताराम पाटील, डॉ भारत पाटणकर ही प्रकल्पग्रस्तांच्या
चळवळीतील जुनी जानती मंडळी असल्याचे त्यांनी सांगितले.
१९७५
मध्ये प्रस्थापीत पुरुष केंद्रीत विचाराला आव्हान देणारी चळवळ राज्यात सुरु झाली.
याच काळात दलित साहित्याला बहर आला आणि या साहित्याने गावकुसाबाहेरचे जगणे
साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. बाबा आमटे यांचे ‘आनंदवन’ हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान ठरले. अण्णा हजारे यांच्या
राळेगणसिध्दी गावाने गावाची ताकद दाखवून दिली. पोपटराव पवारांचे हिवरेगाव देशात
मॉडेल ठरले.
८० च्या दशकात ‘भारत विरूध्द इंडिया’ ही शरद जोशींची मांडणी
आणि त्यातून झालेली अनोखी आंदोलने यामुळे शेतीच्या अर्थकारणाकडे बघण्याचा
दृष्टीकोण मिळाला. गडचिरोलीतील सर्च संस्थेच्या माध्यमातून डॉ.अभय आणि डॉ राणी बंग
यांनी घरच्याघरी नवजात बालकांची काळजी
घेण्याचा वस्तूपाठ समाजापुढे घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी स्वयंसेवी
संस्थांची बलस्थान आणि कमजोरी यावरही भाष्य केले. माहिती तंत्रज्ञान हे स्वयंसेवी
संस्थाच्या कामाला पुरक ठरत आहे. जनहीत याचिका, माहितीचा अधिकार आदींचा जोरकस
वापरकरून जनतेच्या समस्या सोडविण्यातही स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार असल्याचे त्या
म्हणाल्या. स्वयंसेवी क्षेत्राला समाजातील सर्व स्तरातून मार्गदर्शन व मदतीची गरज
असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
आमच्या
ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
००००
िरितेश भुयार /वृत्त वि. क्र.७६ /दिनांक १.०४.२०२१
No comments:
Post a Comment