Tuesday, 31 August 2021

खावटी अनुदान योजनेच्यामाध्यमातून 12 लाख आदिवासी कुटुंबांना लाभ- आदिवासी विकास मंत्री ॲड के. सी. पाडवी


 


नवी दिल्ली, 31 : राज्य शासनाच्या आदिवासी  विकास विभागाच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून एका वर्षात १२ लाख कुटुंबातील ६० लाख सदस्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड के.सी. पाडवी यांनी आज दिली.

            ॲड. पाडवी हे दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) यांनी महाराष्ट्र सदन येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान ॲड. पाडवी यांनी ही माहिती दिली.

           १९७८ ते २०१५ या कालावधी दरम्यान राज्यात आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास महामंडळाच्या  माध्यमातून आदिवासी खावटी कर्ज योजनेद्वारे लाभ देण्यात येत होता. मात्र, २०१५ नंतर  ही योजना बंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, कोविड-१९ महामारीच्या काळात राज्यातील आदिवासींचे कोकणासह कर्नाटक, गुजरात,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात मजुरीसाठी होणारे स्थलांतर टाळण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ४ मे २०२० रोजी राज्यात  खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून प्रति कुटुंब २ हजार रुपये रोख आणि २ हजार रुपयांचे अन्नधान्य वितरित करण्यात येते.  एक वर्षातच या योजनेच्या माध्यमातून  राज्यातील १२ लाख आदिवासी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला असून लाभार्थ्यांची एकूण संख्या ६० लाख असल्याचे ॲड. पाडवी  यांनी सांगितले.

               खावटी कर्ज योजनेच्या माध्यमातून  वर्ष १९७८ ते २०१५ दरम्यान राज्यातील १० लाख ५० हजार कुटुंबांनी लाभ घेतला होता. त्या तुलनेत खावटी अनुदान योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याचेही   ॲड. पाडवी यांनी अधोरेखित केले .

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो कर :  https://twitter.com/MahaGovtMic      

                                                      ०००००                     

  रितेश भुयार/ वृत्त वि. क्र. १९१ / दिनांक  ३१.०८.२०२१

 

Saturday, 28 August 2021

लोकप्रतिनिधित्व हे जनसेवेकरिता मिळालेली उत्तम संधी – राज्यपाल








              ‘भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारीपुस्तकाचे प्रकाशन 

 नवी दिल्ली, 28 :   लोकप्रतिनिधित्व हे जनसेवेकरिता व योग्यता वाढविण्याकरिता मिळालेली उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

          श्री कोश्यारी यांच्या संसदीय कार्यावर आधारित भारतीय संसद में भगतसिंह कोश्यारी या पुस्तकाचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते येथील कॉन्स्टिटयूशन क्लब मध्ये प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, ज्येष्ठ नेते श्याम जाजू, चाणक्य वार्ता प्रकाशन समुहाचे प्रमुख डॉ अमीत जैन यावेळी उपस्थित होते.

                   श्री कोश्यारी पुढे म्हणाले, देशाची संसंद ही भारतीय लोकशाहीचे मंदिर आहे येथे देशाच्या वेगवेगळया भागातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनहिताचे विषय मांडतात व जनभावनेला न्याय मिळवून देतात. लोकसभा आणि राज्यसभेत खासदार म्हणून कार्य करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी व्यक्त केले. संसदेला लाभलेल्या श्रेष्ठ नेत्यांच्या परंपरेवरही त्यांनी प्रकाश टाकला.  संसद व  विधीमंडळांच्या  सदनामध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधिंनी आपल्या पदाचा गर्व न बाळगता जनसेवा करावी व स्वत:ची योग्यता वाढवावी असेही त्यांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतीकारकांच्या बलीदानाचे स्मरण करून आदर्श भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरीकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

            यावेळी  केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, श्याम जाजू यांची भाषणे झाली. दिल्ली स्थित चाणक्य वार्ता  प्रकाशनाने भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारीया पुस्तकाचे प्रकाशन केले असून डॉ अमीत जैन हे या  पुस्तकाचे लेखक आहेत    

                                                     ०००

वृत्त वि. क्र. 190 / दिनांक  28.08.2021

 


 

Friday, 27 August 2021

उपसंचालक दयानंद कांबळे यांना निरोप







                         

नवी दिल्ली, 27 :  महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची प्रशासकीय बदली झाली असून आज त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.

            परिचय केंद्रात आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला, जनसंपर्क अधिकारी अमराज्योत कौर अरोरा यांनी श्री  कांबळे यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी व अभ्यागत उपस्थित होते.

            श्री कांबळे यांनी २६ ऑगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीच्या उपसंचालक पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या नेतृत्वात कार्यालयाने राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळांसह विविध महत्वाचे उपक्रम राबविले. कार्यालयाची एसएमएस सेवा, तीन भाषांमधील ट्विटर हँडल्स यासह समाज माध्यमांद्वारे जनसंपर्काचे उत्तम कार्य झाले. लोकसभा, विधानसभा पूर्वपिठिका, खासदार परिचय पुस्तिका आदी  कार्यालयाचे प्रकाशने व कार्यालयाच्यावतीने प्रदर्शनांचे यशस्वी आयोजनही करण्यात आले. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या (SIPRA) संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी   भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने श्री कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालचे यशस्वी आयोजन नुकतेच पार पडले. या कार्यालयाचे उपसंचालक म्हणून त्यांनी आठ वर्षांचा कालवधी पूर्ण केला आहे. नुकतीच श्री. कांबळे यांची प्रशासकीय कारणास्तव माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुख्यालयात (मुंबई)  वृत्त व जनसंपर्क उपसंचालक म्हणून बदली झाली आहे.

   या निरोप समारंभास  हरियाणा परिचय केंद्राचे उपसंचालक जगदीप दुहान, तेलंगणा परिचय केंद्राच्या  उपसंचालक हर्षा  भार्गवी, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी, पत्रकार निवेदिता वैशंपायन यांच्यासह अभ्यागत उपस्थित होते.

                       अमरज्योत कौर अरोरा यांना उपसंचालकपदाचा अतिरीक्त कार्यभार 

          दयानंद कांबळे यांनी आज कार्यालयाच्या उपसंचालकपदाचा कार्यभार कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी अमराज्‍योत कौर अरोरा यांना सूपर्द केला. श्रीमती अरोरा आता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक पदाचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणार आहेत.                                                                          

                                              ०००००                     

   वृत्त वि. क्र. १८९ / दिनांक  २७.०८.२०२१

 

 

 

 

 

 

 

 

Monday, 23 August 2021

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

 





       राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने पुरस्कार वितरण     

नवी दिल्ली, 23 :  महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे.

               गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

            केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४४ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून खुर्शिद शेख आणि उमेश खोसे या दोन शिक्षकांचा यात समावेश आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रपतींच्या हस्ते व गडचिरोली व उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री शेख आणि श्री खोसे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

             गडचिरोली  जिल्हयातील आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षक म्हणून खुर्शीद शेख यांची  शिक्षण क्षेत्रात वेगळीच ओळख आहे. त्यांनी  शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंबन करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडविले आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीन शिक्षण देण्यासाठी शाळेत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूल्याधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरिता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.

              उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी  तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकता यावे यासाठी ५१ ऑफलाइन ऍपची निर्मिती केली. व्हिडिओ निर्मिती करून स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्य निर्माण केले आहे. 

                                                        0000

        रितेश भुयार/ वृत्त वि. क्र. १८८ / दिनांक  २३.०८.२०२१

 

 

 

 

 

 

 

 


Friday, 20 August 2021

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र



नवी दिल्ली, २० : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी अपूर्व चंद्र यांची माहिती  व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

               केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनट नियुक्ती समितीने गुरुवारी अपूर्व चंद्र यांच्या नियुक्तीस मंजुरी  दिली. श्री. चंद्र हे महाराष्ट्र  कॅडरच्या १९८८ तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण विभागात महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्येही श्री  चंद्र प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी  २०१३ ते २०१७ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात प्रधान सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.  

0000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र. १८७ / दिनांक  २०.०८.२०२१

 


 

राजधानीत सद्भावना दिन साजरा





नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी श्री गोयल यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी- कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली .

                     महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा  

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी  स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. 

0000  

 

   वृत्त वि. क्र. १८६ / दिनांक  २०.०८.२०२१

 

 

 

 

 

 

 

 

 

Saturday, 14 August 2021

विधायक धोरणांच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्राची विकासात्मक वाटचाल सुरु– प्रा. सुहास पळशीकर


 


नवी दिल्ली ,१४ : विधायक धोरणांच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र राज्य विविध आव्हानांवर यशस्वीरित्या मात करत विकासात्मक वाटचाल करीत आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी आज व्यक्त केले.

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल : धोरणात्मक स्थित्यंतरे आणि आव्हाने विषयावर ६०वे पुष्प गुंफताना प्रा. पळशीकर  बोलत होते. 

                  राज्यस्थापनेनंतर महाराष्ट्रासमोर शेती आणि बिगरशेती या हितसंबंधाची सांधे जोड करणे तसेच ग्रामीण व शहरी विकासाचा समतोल साधणे हे मोठे आव्हान होते. त्याच्या जोडीने औद्योगिक विकास साधणे हेही आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी महाराष्ट्राने कृषी औद्योगिक विकास, औद्योगिक विकास साधण्याचे व  सहकार क्षेत्राला चालणा देण्याचे कार्य झाले. जिल्हयाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा परिषदांच्या माध्यमातून सत्तेचे, अधिकार व धोरणांचे विकेंद्रीकरण झाले. मराठी अस्मितेला विधायक वळण देण्यासाठी राज्यात स्थापन झालेले साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोष महामंडळ यातूनही राज्याची धोरणात्मकदृष्टी दिसून येते.या  धोरणात्मक आधारांवर सुरु झालेल्या महाराष्ट्राच्या वाटचालीमुळेच १९६० पासून महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य म्हणून पुढे यायला सुरुवात झाल्याचे प्रा. पळशीकर म्हणाले.

                महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच्या राजकारणाचा १९६० ते १९९० हा एक पक्षीय वर्चस्वाचा कालखंड तसेच  गेल्या ३० वर्षांचा आघाडयांच्या राजकारणाचा कालखंड  व आघाडयांच्या राजकारणाची फेररचनेचा परामर्शही त्यांनी यावेळी घेतला.

           धोरणांची आखणी व त्याची अंमलबजावणी यातून राज्यात निर्माण झालेले प्रश्न, १९७० व १९८० च्या दशकात तीव्र झालेले हे प्रश्न, शेती, सिंचन व प्रादेशिक असमतोल या  विविध समस्या व त्यांच्या सोडवणुकीसाठी केलेले  प्रयत्न यावरही  प्रा. पळशीकर यांनी प्रकाश टाकला.

                 ९० च्या दशकात राजकारण व अर्थकारणात बदल झाले  तसेच आघाडयांच्या राजकारणालाही सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. देशाची आर्थिक धोरणे बदलली, खाजगीकरणाचे धोरण आले यानुसार खाजगी उद्योगाला चालना मिळाली. खाजगी व व्यावसायिक शिक्षणालाही वाव मिळाला. परिणामी , गेल्या ३० वर्षात महाराष्ट्रात  शिक्षणाच्या संधीचा विस्तार झाला.   

          भारतीय संघराज्य पध्दतीनुसार केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या संघराज्याच्या चौकटीत महाराष्ट्राची धोरणात्मक वाटचाल झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राच्या एकूण धोरणांवर, विकासावर व राज्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर अमीट ठसा उमटला. त्यांनी केलेल्या धोरणांच्या पायाभरणीतून महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून आजतागायत ही धोरणे मार्गदर्शक ठरत असल्याचे ते म्हणाले.

                  स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात झालेल्या स्थित्यंतराचा महाराष्ट्र हा एक महत्वाचा भाग होता. याच स्थित्यंतराचा भाग म्हणून निवडणूक व लोकशाहीच्या राजकारणाच्या माध्यमातून सत्ता बहुजन सामाजापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. महाराष्ट्रात याचे नैतृत्च यशवंतराव चव्हाण यांनी केले.  बहुजन समाजाकडे झालेले सत्तांतर हे सलोख्याने कसे टिकेल हे आव्हान  त्यांच्या पुढे होते व हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले होते.

                     व्याखानाचा समारोप करताना त्यांनी राज्यातील आदिवासी क्षेत्रांचा विकास तसेच तेथील संसांधनांच्या मालकीविषयी स्पष्टता असणारे धोरण आखण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच, लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून जिल्हा आणि तालुका पातळीवर सुनियोजीत अंमलबजावणी व्हावी. नगरपालिका क्षेत्रात शहरी रोजगार हमी योजनेबाबतचे धोरण राबविण्यात यावे तसेच नागरीकरण विषयक आयोग नेमण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उज्ज्वल परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र राज्याची धोरणात्मक महत्वाकांक्षा येथील नागरिकांमध्येही  जागत  राहील असा विश्वास प्रा. पळशीकर  यांनी व्यक्त केला . 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००    

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१८२/दिनांक १४.०८.२०२