Saturday, 14 August 2021

मौखिक लोकवाङ्मय हे सर्व सामान्यांच्या जगण्याचे तत्वज्ञान : डॉ. अरूणा ढेरे

 


नवी दिल्ली , 14 :मौखिक लोकवाङ्मय हे सर्व सामान्यांच्या जगण्याचे तत्वज्ञान असल्याचे मत डॉ. अरूणा ढेरे यांनी मांडले. 

   महाराष्ट्राचे लोकसाहित्य व स्त्रियांचे योगदान विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 59 वे पुष्प गुंफताना डॉ. अरूणा ढेरे बोलत होत्या.

     डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या,   मौखिक लोकवाङ्मय हे माणसांना माणसांशी जोडते, आधार देते. माणसांच्या जन्मापासून ते मृत्यपर्यंतची संबंध मौखिक परंपरेमध्ये गाणी आहेत.  बारश्यापासून सुरू होणारी  गाणी मरतीकांच्या गाडयापर्यंत आहेत. संपूर्ण आयुष्याला सोबत करणारे हे लोकवाङ्मय आहे. माणसाच्या आयुष्याच्या  प्रत्येक टप्प्यावर आधार देणारे, त्याला योग्य दिशेने पुढे नेणारे, एकूण समाज जीवनात, सार्वजनिक जीवनात भलेपणाची पेरणी करणारे असे हे मौखिक लोकवाङ्मय महाराष्ट्राला मिळालेली मोठी देणगी असल्याचे, डॉ. ढेरे म्हणाल्या.

          लोकपरंपरा आणि तिच्यातील वाङ्मय ही एक समृध्द्ध  परंपरा आहे. ही परंपरा केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील सर्वच भाषांमध्ये मौखिक लोकवाङ्मयाची हजारो वर्षांची परंपरा चालत असल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील या लोकवाङ्मयातून अनेक प्रकारचे लोकसाहित्य, तसेच अभिजात साहित्यालाही लोकवाङ्मयातून प्रेरणा म‍िळाली,  असल्याचे डॉ. ढेरे यावेळी म्हणाल्या.  

         लोकवाङ्मय लोप पावू नये, म्हणुन  वाङ्मयाच्या अभ्यासाची  गरज भासू लागली.  हे वाङ्मय शब्दबद्ध करण्याची गरज भासू लागली. राजवाडे, चाफेकर, दुर्गाबाई भागवत, सरोजनी बाबर, डॉ. रा.चि.ढेरे, प्रभाकर मांडे यांच्या सारख्या अभ्यासकांनी महाराष्ट्रातील लोकवाङ्मय समृद्ध असल्याची  जाणीव  करून दिली.

        लोकगीतांचा विचार केला तरी महाराष्ट्रातच कितीतरी लोकगीते आहेत. कोळयांची, भारल्यांची इतर जातीतील लोकगीते आहेत. आदीवासी समाजातील लोकगीते आहेत.  सर्व ग्रामजीवन लोकगींतामध्ये ओवले गेले असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या. लोकगीताप्रमाणाचे लोककथाही मराठी मातीत मोठयाप्रमाणात आहे. यामध्ये ऐतिहासिक कथा, अद्भुत  भुता- खेतांच्याकथा, दंतकथा, रहस्यकथा, पौराणिक कथा अशा अनेक प्रकारांच्या लोककथा येथे दिसतात. यासोबतच स्त्रोत, भूपाळया, पाळणे, आरत्या, पद त्याबरोबर उबाळया, लावण्या आहेत. त्याप्रमाणे लोकनाटयांना आधार देणारे गीतांचे प्रकारही आहेत.  किर्तन परपंरेचाही प्रवाह येथे आहे. आख्याने ही सुद्धा लोकवाङमयाचीच देणगी असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या.

      लोकसाहित्य जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासन पुढे आले आणि या संदर्भात लोकसाहित्य समिती नेमली असल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले. महाराष्ट्र संस्कृतीची सर्व अंगे ही या लोकवाङमयातून आल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या.

         लोकदैवतांचेही फार मोठी मौखिक लोकसाहित्य आहे. हे ही या लोकवाङ्मयाचाच भाग असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या. हे मौखिक साहित्य हजारो वर्षापासून एका पिढीकडून दूस-या पिढीकडे मौखिकरित्या आले असल्याचा उल्लेख डॉ ढेरे यांनी केला. या सर्व लोकसाहित्यांच्या नोंदी आज महत्वाच्या आहेत. त्यातून त्या-त्या काळातील लोकजीवनाचा अदांज घेता येतो. तसेच सवांदाचे माध्यम म्हणून याचा होणारा वापर किती महत्वाचा होता हे लक्षात येत असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या.   

        स्त्रियांना जेव्हा काहीच अधिकार प्राप्त नव्हते त्याकाळात स्त्रियांनी लोकवाङ्मयाच्या माध्यातूनच आपले सुख, दु:ख, आनंद, सल, आलेले अनुभव, शहाणपणा त्या ओव्यातून  मांडत असत आणि तेच त्या आपल्या पुढच्या पिढीला देत असत,  संस्कारित करीत असे, या स्त्रिया त्या काळात पुरोगामी असल्याचे डॉ.ढेरे यांनी सांगितले.  आपल्याकडील जे लोकवाङमय आहे ते निर्सगाशी संबंधित आहे. झाडे, पक्षी, प्राणी यांचे असणारे मनुष्याशी नाते. एकमेकांना सृष्टीचे घटक मदत करीत  असतात. या सगळया सृष्टीचा आपणही एक घटक आहोत याबद्दलही लोकवाङ्मयातून व्यक्त होत गेल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले.  पौराणिक कथेतून प्रेरणादायी प्रसंगही लोकवाङ्मयातून आल्याचे दिसते. यावेळी त्यांनी महालक्ष्मी, विष्णु, लाकूडतोडयाची गोष्ट,  विठ्ठल, संत नामदेव, यांच्या प्रसंगानुरूप कथा ऐकवल्या, या कथामागील उद्देश महात्म्य डॉ. ढेरे यांनी यानिमित्त सांगितले.  

               

No comments:

Post a Comment