Friday, 13 August 2021

आधुनिक मराठी वांड्मयाने मराठी भाषा व संस्कृती समृध्द केली - प्रसिध्द साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे


 


नवी दिल्ली ,१३ : आधुनिक मराठी वांड्मय हे  स्वाभिमानाने पेटलेले, हक्कांच्या जाणिवांनी प्रेरित झालेले व मानवाच्या मुक्तीसाठी उच्चरवाने बोलणारे आहे. याच वांड्मयाने मराठी भाषा व संस्कृती समृध्द केली,असे मत प्रसिध्द साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे  यांनी आज व्यक्त केले.

              आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वांड्मयाची ओळख विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ५८वे पुष्प गुंफताना डॉ. लिंबाळे बोलत होते.

                  मराठी भाषेमध्ये निर्माण झालेले विभिन्न व महत्वपूर्ण वांड्मय प्रवाह अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेमध्ये नाही. वैशिष्टयपूर्ण वांड्मय प्रवाहांमुळेच स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य अतिशय जीवंत, रसरसित व मानवी अधिकारांची भाषा बोलणारे ठरले आहे. नवसाहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, मुस्लिम मराठी साहित्य, ख्रिस्ती,जैन, विरशैव साहित्य आदीं वांड्मय प्रवाहांच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राच्या मानसिकतेचे भरण-पोषण झाले. या वांड्मयाने वाचकांना अभिरूची संपन्न केले व त्यांना जगाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली असेही डॉ. लिंबाळे यांनी सांगितले.

                मराठी साहित्यात भाषिक, वांड्मयीन व शैलीचे प्रयोग झाले आहेत. मराठी साहित्याकडे देशाचे    जगाचे लक्ष्य लागून राहिले असून याचे श्रेय स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात निर्माण झालेल्या विविध वांड्मय प्रवाहाला जाते. मराठीत निर्माण झालेले महत्वपूर्ण वांड्मय प्रवाह अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेमध्ये नसल्याचे डॉ. लिंबाळे यांनी अधोरेखित केले.

          नव साहित्य या वांड्मय प्रवाहाने मराठीतील चाकोरीला हादरे देण्याचे काम केले. नवसाहित्याचे पुरस्कर्ते दिलीप चित्रे, भाऊ पाद्ये यांसारख्या लेखकांनी पारंपरिक साहित्याचे दरवाजे खिळखिळे केले. यानंतर अभिव्यक्तितील बंडखोरपणा सर्वदूर पसरला आणि अनेक सामाजिक वर्गातून लेखक नव्याने लिहू लागले.  यातून दलित साहित्य चळवळ पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.

            दलित साहित्याने स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक प्रश्नांचे भान करून देण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेवून लेखकांनी दलित साहित्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या  जनतेसमोर ठेवल्या. या साहित्याने वेगळा माणूस ,वेगळा समाज, वेगळा नायक-नायिका असे अनेक वेगळे विषय साहित्यात आले. मराठीतील दलित साहित्य हे भारतासह जगात कुतुहलाचे ठरले आहे. दलित साहित्याने बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ, दया पवार,अर्जुन डांगळे यांसारखे महान साहित्यिक दिले. दलित साहित्याचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात सहभाग झाला आणि त्यावर संशोधनही  झाले. आज या साहित्याची दखल घेवून अन्य भाषेत दलित साहित्य निर्माण होत असल्याचे डॉ. लिंबाळे म्हणाले.

                       मराठी वांड्मय प्रवाहात ग्रामीण साहित्याचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण साहित्याचा चेहरा मोहरा बदलला. शेती आणि शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न मोठ्या प्रमाणात  ग्रामीण बोलीतून ग्रामीण साहित्यात मांडले गेले. प्रा. नागनाथ कोतापल्ले, आनंद यादव, रा.रा.बोराळे या सारख्या मान्यवरांनी ग्रामीण साहित्याचा प्रवाह नेटाने पुढे नेला. ग्रामीण माणूस व त्याचे जीवन व त्यांची  व्यथा समोर आणण्याचे काम या साहित्याने केले आहे.

             स्त्रीमुक्तीचे साहित्य मराठीत मोठया प्रमाणात लिहिले गेले. छाया दातार, विद्या बाळ या मराठीतील बिनीच्या स्त्री लेखिका आहेत. रीटा वेलणकर ही शांता गोखले यांची कांदबरी महत्वपूर्ण आहे. स्त्रियांच्या व्यथा, स्त्रीमुक्तीचे प्रश्न समाजात स्त्रियांना असलेले दुय्यमस्थान याबाबत विपूल लेखन झाले. मराठीतील स्त्रीवादी  लेखन हे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच पाश्चात्य विचाराने प्रेरित झाल्याचेही त्यांनी सांगितले.

            जंगलामध्ये राहणा-या माणसांविषयी त्यांच्या प्रश्नांविषयी बोलणारे आदिवासी साहित्य, मुस्लिम समाजाच्या वाटेला आलेला न्यूनगंड  व त्यांचे मन व्यक्त  करणारे मुस्लिम मराठी साहित्य तसेच ख्रिस्ती ,जैन, विरशैव आदी अल्पसंख्यांक समाजाने आपले वेगळेपण साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. लिंबाळे म्हणाले. समाजाची वैज्ञानिक मानसिकता निर्माण करण्यास पोषक ठरणारे विज्ञान साहित्य, बालकांचे प्रश्न समजून घेवून निर्माण झालेली बाल साहित्याची चळवळ, राज्यातील विविध सामाजिक चळवळींनी निर्माण केलेले बदलाचे वातावरण तसेच अहिराणी, कोकणी ,वऱ्हाडी भाषेला प्रतिष्ठा देणारे प्रादेशिक साहित्य यावर डॉ. लिंबाळे यांनी प्रकाश टाकला.

             महाराष्ट्रातील साहित्य परिषदा, साहित्य विषयक संघटना राज्यातील लेखकांना वाढविण्याचे कार्य करीत आहे. राज्यात मोठा जाणकार  वाचक वर्ग असून मराठी साहित्यावर त्याने उदंड प्रेम केले आहे. वाचक, प्रकाशक, ग्रंथपाल, ग्रंथविक्रेते, दिवाळीअंक, वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या यामुळे मराठी लेखकाला मोठे व्यासपीठ व संधी मिळते. मराठीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान सन्मान मिळत आहे. अनुवादाच्या माध्यमातून मराठीतील साहित्य देश व जगात पोहचले आहे.

                आधुनिक तंत्रज्ञानाच्या गतीमुळे मराठी साहित्याचा चेहरामोहरा आणखी बदलेल ,लेखकांना नवीन विषय मिळतील व आधुनिक मराठी साहित्याचे स्वरूपही बदलेल, असा विश्वास डॉ. लिंबाळे यांनी यावेळी व्यक्त केला.              

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००    

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१७७/दिनांक १३.०८.२०२     

 

No comments:

Post a Comment