नवी दिल्ली ,११ : महात्मा फुलेंच्या कार्याचा कृतीशील पुरस्कार करत
छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाचे सहकार्य करणारे महाराजा
सयाजीराव गायकवाड यांनी राज्याच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना व
संस्थांना पाठबळ देवून महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा बळकट केली,असे मत प्रा. दिनेश पाटील यांनी आज
व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने
आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण आणि महाराजा
सयाजीराव गायकवाड” विषयावर ५५वे पुष्प गुंफताना प्रा. पाटील बोलत होते.
बडोदा संस्थानच्या महाराजा सयाजीराव
गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या समाजोध्दाराच्या
तत्वज्ञानाचा आपल्या संस्थानात अवलंब करून कृतीशील कार्य केले. छत्रपती शाहू
महाराजांनी सयाजीराव महाराजांकडे वेगवेगळया प्रकारचे सहकार्य मागितले व विविध
लोकोपयोगी योजनांचा पुरस्कार केला, या दोन्ही राजांमध्ये उल्लेखणीय ऋणानुंबध होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बौध्दिक नेतेपदाची जडणघडण सयाजी महाराजांच्या
द्रष्टेपणातून निर्माण झाली. तसेच,महाराष्ट्राच्या
विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना व संस्थांना सर्वतोपरी पाठबळ देवून त्यांनी
राज्याची पुरोगामी विचारधारा भक्कम केली व आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीत मोलाचे
योगदान दिल्याचे प्रा. पाटील म्हणाले.
सयाजीराव महाराजांनी आधुनिक
भारताच्या पायाभरणीच्या कार्याची सुरुवात आपल्या बडोदा संस्थानातून केली. शिक्षण,आरोग्य,
उद्योग, सहकार अशा सर्व क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कार्य केले. पुरोगामी
विचारधारेला बळकट करून त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीतही बहूमोल कार्य
केल्याचे प्रा. पाटील म्हणाले.फुले,शाहु,आंबेडकरांचा वैचारीक वारसा लाभलेल्या
महाराष्ट्रातील या महापुरुषांसोबत सयाजीराव महाराजांचे उत्तम नाते होते.
महात्मा फुलेंनी मांडलेले
तत्वज्ञान सयाजीराव महाजराजांनी आपल्या संस्थानात कृतीत आणले. १८८२ मध्ये महात्मा
फुले यांनी ‘हंटर कमिशन’ समोर एक साक्ष देवून समाजातील बहुजन वर्ग व स्त्रियांना मोफत व सक्तीचे
शिक्षण देण्याची मागणी केली होती. महात्मा फुलेंची हीच मागणी कृतीत आणत सयाजीराव
महाराजांनी १८८२ मध्येच बडोदा संस्थानात अस्पृश्य व आदिवासी मुलांसाठी निवासी शाळा
सुरु केली. या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शालेय साहित्य दिले. १८८२
मध्येच त्यांनी महिला शिक्षिका निर्माण होण्यासाठी स्त्री शिक्षणशास्त्र
महाविद्यालयाची स्थापना केली. ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथाच्या प्रकाशणासाठी सयाजीराव
महाराजांनी महात्मा फुले यांना आर्थिक मदत केली. बडोदा संस्थांनात त्यांनी सुरु
केलेली ग्रंथालय चळवळ ही महात्मा फुलेंच्या
शुद्राती शुद्रांच्या शिक्षणाचे महाअभियानच होते. सत्यशोधक चळवळीतील
कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या संस्थानात
महत्वाच्या पदावर नौकरी दिल्याचेही
प्रा. पाटील यांनी नमूद केले.
सयाजीराव महाराज हे छत्रपती शाहू
महाराजांसाठी मित्र,तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होते. कोल्हापूरच्या शाहू संशोधन केंद्राने
प्रकाशित केलेल्या १० खंडांमध्ये उपलब्ध असलेल्या २२ पत्रांमधून शाहू महाराजांनी
सयाजीराव महाराजांकडे वेगवेगळया प्रकारचे सहकार्य मागितल्याचा उल्लेख आढळतो असे
प्रा. पाटील यांनी सांगितले. सयाजीराव महाराजांनी १८८२ पासून बडोदा संस्थानात
शिक्षण प्रसाराचे कार्य सुरु केले व पुढे १९०६ मध्ये मुला-मुलींसाठी मोफत व
सक्तीच्या शिक्षणाचा भारतातील पहिला कायदा आपल्या संस्थानात लागू केला. हाच कायदा
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात
तंतोतंत राबविला. हे प्राथमिक शिक्षणाचे कार्य आपण जीवनध्येय म्हणून स्वीकारत असल्याचे
शाहू महारजांनी २२ सप्टेंबर १९१७ मध्ये सयाजीराजांना पत्र लिहून कळविले होते. विविध
दाखले देवून कोल्हापूर संस्थानात कायदे करताना शाहू महाराजांसमोर सयाजीराव
महाराजांचा आदर्श होता असे प्रा. पाटील यांनी अधोरेखित केले.
आधुनिक भारतातील क्रांतिकारक नेते
म्हणून ओळख असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत सयाजीराजांची भूमिका
क्रांतीकारक असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या पदवी
शिक्षणाच्या दोन वर्षांमध्ये दरमहा २५ रूपयांची शिष्यवृत्ती तसेच, १९१३ ते १९१७ या कालावधि दरम्यान अमेरिका
आणि इंग्लड येथील उच्च शिक्षणाप्रसंगी ९२०
पौंडांची शिष्यवृत्ती प्रदान केली. या माध्यमातून बाबासाहेबांची बौध्दिक
नेता म्हणून असलेली जडणघडण सयाजीराजांच्या द्रष्टेपणातून निर्माण झाल्याचे प्रा.
पाटील म्हणाले. १९२४ मध्ये बाबासाहेबांनी आपल्या प्रबंधावर आधारित प्रकाशित केलेला
ग्रंथ कृतज्ञतापूर्वक सयाजीराव महाराजांना अर्पण केला . यातूनच बाबासाहेबांच्या जीवनात
सयाजीराव महाराजांविषयीचा आदर स्पष्ट होतो, असे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांनी
आरंभिलेल्या चळवळीलाही सयाजीराव
महाराजांनी केलेल्या मोलाच्या आर्थिक मदतीबाबत
विविध प्रसंगांद्वारे प्रा. पाटील यांनी प्रकाश टाकला.
महाराष्ट्राच्या या तीन महापुरुषांसह
राज्यातील तज्ज्ञ मंडळी व संस्थांना त्यांनी मोलाचे पाठबळ दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे
चरित्र प्रकाशित करण्यासाठी त्यांनी कृष्णराव केळुस्कर यांना आर्थिक मदत केली. ज्ञानकोषकार
श्रीधर व्यंकटेश केतकर यांना परदेशात जावून संशोधन करण्यासाठी आर्थिक मदत केली.
अस्पृश्योध्दाराचे कार्य करणारे थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांना बीए. आणि
एलएलबीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. १९०७ मध्ये बडोदा येथे विठ्ठल रामजी
शिंदे यांचे भाषण आयोजित केले तसेच या भाषणावर आधारित ‘बहिष्कृत भारत’ या पुस्तकाच्या रुपात प्रकाशित
प्रती विकत घेवून वाटल्या. विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या
अस्पृश्यांच्या परिषदेचे अध्यक्षपदही सयाजीराव
महाराजांनी भूषविले होते असे प्रा. पाटील
म्हणाले.
सयाजीराव महाराजांनी लो. टिळकांना
स्वातंत्र्य लढयाच्या कार्यात पाठबळ दिले होते.पुण्यातील केसरीवाडा हा मूळचा
गायकवाडवाडा होय. १९०४ मध्ये सयाजीराव
महाराजांनी लो.टिळकांना कागदोपत्री व्यवहार दाखवून हा वाडा दान केल्याचा संदर्भही
प्रा. पाटील यांनी दिला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या निर्माणासाठी तसेच
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याला त्यांनी मदत
केली. सयाजीराव महाराजांनी महाराष्ट्रातील विविध संस्था व विद्वान व्यक्तींना
केलेल्या मदतीचा धावता आढावा त्यांनी
घेतला.
महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती
संवर्धनासाठी येथील तज्ज्ञ मंडळी,संस्था व विविध उपक्रमांसह सर्वांगीण उभारणीसाठी सयाजीराव
महाराजांनी ३०० कोटींचे अर्थसहाय्य केले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत
सयाजीराव महाराजांचे योगदान सर्वदूर पोहचावे यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजा
सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करून या समितीमार्फत ६२
खंड प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले.
सयाजीराव महाराजांच्या धोरणांमध्ये
जाती धर्माच्या संवादी समाजकारणाच्या विकासाचे सूत्र सापडते. त्यांच्या धोरणातून
प्रेरणा घेवून महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल सक्षमपणे व्हावी, अशा भावना प्रा.
पाटील यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर
हॅण्डलला फॉलो करा:http://twitter.com/micnewdelhi
०००००
रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१७१/दिनांक ११.०८.२०२१
No comments:
Post a Comment